खड्ड्यांमधुनी शोधत रस्ता
आख मार्ग तू तुझा
जपून चालव गाडी अथवा
तुटेल ऍक्सल तुझा!
इकडे खड्डे, तिकडे खड्डे
जिकडे तिकडे खड्डे
पाण्याने भरलेले काही
काही उघडे खड्डे
खड्ड्यामधूनी गाडी जाता
फुटेल टायर तुझा
जपून चालव गाडी अथवा
तुटेल ऍक्सल तुझा!
खड्डे दुरुस्त करण्यासाठी
हाक कुणाला देशी?
इथे कुणाचा कुणीच नाही
सर्व इथे दरवेशी!
महापालिका तुझी न वेड्या
महापौर ना तुझा
जपून चालव गाडी अथवा
तुटेल ऍक्सल तुझा!
पाहुन इतके खड्डे तुजला
असंतोष का नाही?
साध्या सुविधा घेण्यासाठी
तुला जोष ना नाही?
कळे न कैसा गायब झाला
कणा कुठेसा तुझा!
जपून चालव गाडी अथवा
तुटेल ऍक्सल तुझा!
पुणेकरांच्या ('कणा'हीन) सहनशीलतेला आणि पुणे महानगरपालिकेच्या उर्मट बेफिकीरीला सादर समर्पण...
- प्रसाद शिरगांवकर
(कॉपी-पेस्ट व्यावसायिकांना विनंती... ही कविता स्वतःच्या कष्टानी ईमेलद्वारे इतरांना पाठवण्यास माझी काहीही हरकत नाही... मात्र असं करताना मूळ कवीचं (म्हणजे माझं) नाव या कवितेचा कवी म्हणून दिल्यास मी आपला आजन्म उपकृत राहीन!)