प्रसाद शिरगांवकर

सदैव माझा पाठलाग का करीत असतो झब्बू
खेळ कुठेही, खेळ कसाही मलाच मिळतो झब्बू!

फुले घेऊनी जातो जेंव्हा कुठल्या राणीसाठी
राणी तेंव्हा थांबुन असते भलत्या राजासाठी!
'लग्न-पत्रिका' घेऊन येते, देऊन जाते झब्बू
खेळ कुठेही, खेळ कसाही मलाच मिळतो झब्बू!

कामावर मी लवकर जाता बॉस रजेवर असतो
अन केंव्हा मी लवकर निघता बॉस उरावर बसतो
अप्रेजलच्या वेळी मिळतो लाल खुणांचा झब्बू
खेळ कुठेही, खेळ कसाही मलाच मिळतो झब्बू!

भेटण्यास घरमालक येता घरी पसारा असतो
भिंतीवरचा डाग नेमका चुकून त्याला दिसतो
डिपॉझिटची रक्कम सारी कापून नेतो झब्बू
खेळ कुठेही, खेळ कसाही मलाच मिळतो झब्बू!

इतरांना जे अपेक्षीत ते मजला माहित नसते
अन मजला जे वाटत असते त्यांच्या गावी नसते
इस्पीक एक्का असून माझा मिळतो गड्ड्या झब्बू
खेळ कुठेही, खेळ कसाही मलाच मिळतो झब्बू!

Average: 8.7 (148 votes)