आमच्या भूभू ची पोस्टर्स!

प्रसाद शिरगांवकर

परवाच आमच्या भूभूला
काही राजकारणी लोक चावून गेले
अन त्याच्या वाढदिवसाची पोस्टर्स
चौका-चौकात लावून गेले!

'धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं'
म्हणून भूभूला आम्ही धरत नाही
अन दिवसभर भुंकणं सोडून
भूभू दुसरं काही करत नाही!

भूभूच्या या भुंकत रहाण्याची
आम्हाला कधी किंमत नव्हती
म्हणून त्याची पोस्टर्स लावण्याची
आमच्यात कधी हिंमत नव्हती

आम्हाला जे जमलं नाही
राजकारण्यांनी ते करून दाखवलं
आमच्या निरुद्योगी भूभूचं थोबाड
आख्ख्या जगाला मिरवून दाखवलं

भूभूच्या या पोस्टर्स मधे
एक बारीक खुबी होती
मोठ्या भूभूच्या फोटोखाली
छोट्या भूभू ची छबी होती!

खांबाखांबावर फोटो बघून
भूभूला फारच भरून पावलं
'खांबा'चा 'असा'ही उपयोग होतो
हे त्याला कळून चुकलं!

आजकाल आपलं भुंकणं सोडून
पोस्टर्समागे धावतो भूभू
अन पोस्टर्सना कोणी हात लावताच
त्यांना जोरात चावतो भूभू !

भूभू ज्यांना चावतो तेही
आपापली पोस्टर्स लावायला लागतात
कामं सगळी सोडून देऊन
दिसेल त्याला चावायला लागतात!

सगळे चावले एकमेकांना
कोणी बाकी उरलं नाही
मग पोस्टर्स सोडून आमच्या शहरात
दुसरं काही उरलं नाही

मग पोस्टर्स सोडून आमच्या शहरात
दुसरं काही उरलं नाही

- प्रसाद शिरगांवकर

(कॉपी-पेस्ट व्यावसायिकांना विनंती... ही कविता स्वतःच्या कष्टानी ईमेलद्वारे इतरांना पाठवण्यास माझी काहीही हरकत नाही... मात्र असं करताना मूळ कवीचं (म्हणजे माझं) नाव या कवितेचा कवी म्हणून दिल्यास मी आपला आजन्म उपकृत राहीन!)

Average: 8.1 (137 votes)