हल्ली तसा मी लवकरच उठतो. म्हणजे तसा mobile वर buzzer लावलेला असतोच, पण तो वाजायच्या आतच जाग येते. उठल्या उठल्या brush करणं, मग kettle on, करून चहा. चहा झाल्याबरोबर जसा वेळ आणि mood असेल त्यानुसार morning walk, jogging, किंवा अगदीच gym. तिथून आल्यावर व्यवस्थित breakfast आणि shower.
मग office ची तयारी.... normal weekday असेल तर formals आणि friday ला casuals, shoes ना चकाचक polish करून वेळेत घराबाहेर. मग car, bus, train जे काही लागेल त्यानी office मधे हजर. आल्या आल्या computer चालू करून emails check करणं, MSN ला login होणं आणि कोणी chat वर भेटतंय का बघणं. मग दिवसभराच्या कामाचं planning. अगदीच काही urgent आहे का? खूप काही pending आहे का? Boss ला आज नेमकं काय हवंय? कुठला client बोंब मारतोय का?
सगळं planning झालं की दिवसभर meetings, documents, workshops, emails, conference calls या सगळ्यामध्ये गुंतून जाणं. एकीकडे mails, chats, SMS सुरूच.
Office संपायची वेळ झाली की सगळं windup करणं आणि घरी निघणं. संध्याकाळचा plan मात्र depends... कधी कुठे long drive ला जाणं.. कधी कुठे party असते... कधी घरीच TV Serials बघत बसतो.. अगदीच mood असेल तर जवळपासच्या multiplex मधे जाऊन picture टाकतो. कधी light drinks... कधी coffee नंतर just strolling around...
Weekend ही असेच... काहिसे planned, काहीसे unplanned... Laundry, bank ची कामं, बिलं भरणं, socializing, functions... काही ना काही असतंच... सगळं होता होता Monday morning चा buzzer कधी वाजतो ते लक्षातही येत नाही.
असं सगळं रूटीन सुरू असताना, परवाच कधीतरी मी रात्रीचा गच्चीवर गेलो होतो. शांत वेळ होती, स्वच्छ आभाळ होतं. हलकासा वाराही होता. दिवसभर बोललं, लिहिलं, वाचलेलं सगळं आठवत होतं. वर आभाळात पाहिलं तर पूर्ण चंद्रबिंब दिसलं. बहुदा पौर्णिमा असावी. चंद्राकडे पहाताना चंद्रावरचे डागही दिसले. हसू आलं. 'चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन' या ओळी आठवल्या. मग त्या हलक्या वार्याच्या लयी बरोबर लहानपणी शाळेत ऐकून ऐकून पाठ झालेलं पसायदान आठवत गेलं... ज्ञानोबांचे दिव्य शब्द, लताजींच्या आर्त आवाजात मनात रुंजी घालायला लागले. आणि त्या लयीमधे मी रमलो असतानाच मनात खोल कुठेतरी अस्वस्थता जाणवायला लागली.
मी दिवसभर बोलत लिहित वापरत असलेली इंग्रजाळलेली मराठी आणि या शांत शीतल चांदण्यात माझ्या भेवती रुंजी घालणारी ज्ञानोबांची मराठी... कोणती भाषा खरी? कोणती भाषा माझी? मी दिवसभर वापरत असलेल्या भाषेला मी मराठी म्हणत जरी असलो तरी त्यातली क्रियापदं सोडली तर बाकी सगळेच इंग्रजी शब्द! चार सलग वाक्य एकही इंग्रजी शब्द न वापरता बोलायची तर मला धाप लागते. आणि तरीही अट्टाहास करून मी तसं शुध्द मराठी बोललोच तर ऐकणार्याला धाप लागते!
हे काय केलंय मी माझ्या भाषेचं? हे काय करतोय मी माझं?
विश्वात्मक देवाला तोषविण्यासाठी वाग् यज्ञ करणार्या ज्ञानदेवांची मराठी... मना सज्जनाला भक्तिपंथ दाखवणार्या रामदास स्वामींची मराठी... श्रींच्या इच्छेसाठी स्वराज्य स्थापणार्या शिवबांची मराठी... तुकोबांची, एकनाथांची, चोखोबाची मराठी... अटकेपार झेंडे फडकवलेली आणि स्वतंत्रते भगवतेसाठी झुंजणारी विजिगिषु मराठी... या शुद्ध, पवित्र आणि जाज्वल्य भाषेचं मी काय करतोय आणि आजूबाजूला हे काय सुरु आहे?
हे असं झालंच कसं? कशामुळे? आणि कधी? आयुष्यातले पहिले बोबडे बोल ज्या भाषेत बोलले आणि ज्या भाषेचं बोट पकडून मी मुक्तपणे दुनियादारी अनुभवत आणि शिकत गेलो, त्या भाषेचा हात सुटला कधी? कसा? आणि दुसर्याच कोणत्या भाषेचा प्रवाह माझ्या मायबोलीच्या शुद्ध गंगेत मिसळला कसा?
आज सारं अत्याधुनिक ज्ञान इंग्रजी भाषेत आहे. वाढत्या जागतिकीकरणामुळे कामाच्या ठिकाणी इंग्रजीचाच मुक्त हस्ताने वापर होत असतो. ज्ञानभाषा आणि कर्मभाषा दोन्ही इंग्रजी असल्यामुळे ती आत्मसात तर करावी लागलीच. सिवाय वैयक्तिक आयुष्यातली आमची मनोरंजनाची कल्पना hollywood आणि bollywood या दोन 'जंगलांनी' व्यापलेली! एकात अमेरिकन इंग्रजी आणि दुसर्यात इंग्रजाळलेली हिंदी... तिथेही मराठीचा पत्ता नाही. म्हणजे थोडक्यात सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कानांवर, मनावर आणि एकुणात अस्तित्वावर सतत मराठी सोडून इतर भाषांचा होणारा भडिमार. हे कदाचित कारण असावं मायबोलीचा हात माझ्या हातून सुटण्याचं...
विचार करता करता एक गंमत जाणवली. कामाच्या निमित्तानं माझं अनेकदा युरोपमधे हिंडणं, रहाणं झालं आहे. पॅरिसच्या गल्लीबोळांमधे फक्त फ्रेंच बोलतात, ऍमस्टरडॅममधे फक्त डच, आणि म्युनिक / फ्रँकफर्ट मधे फक्त जर्मन. आपल्याल इंग्रजी येत नाही, आणि आपण आपल्या मातृभाषेत बोलत आहोत याचा तिथल्या माणसांना काहीही कमीपणा वाटत नाही. (निदान तसं जाणवत तरी नाही!). पण या उलट परदेशात रहाणारे एकवेळ सोडुन द्या, अगदी सदाशिव, नारायण शनवारात भेटणारी दोन मराठी माणसंही बोलायची सुरुवात 'हॅलो, हाऊ आर यु' आणि शेवट 'ओ.के., थँक यु, बाय' नी करताना दिसतात.
हे जे चाललं आहे ते योग्य आहे का? यातलं काहीही बदलणं मला / आपल्याला शक्य आहे का? का एक दिवस संस्कृत, पाली सारखीच मराठी ही एक मृतभाषा म्हणून जिवंत राहील? (कदाचित जर्मन शास्त्रज्ञांच्या प्रयोगशाळांमधे!)...
जस जसा विचार करायला लागतो तस तसं गरगरायला लागतं... काही सुचत नाही... एकही उत्तर समोर येत नाही.... प्रश्नांचं मोहोळ तसंच रहातं, अस्वस्थता वाढत जाते... खूप उशीर झाला की जाणवतं उद्या ऑफिस आहे. आणि सकाळी मोबाईलवरचा बझर वाजेल.
या सगळ्या थॉट प्रोसेस मधून बाहेर आलं की या सगळ्यावर एकच सोल्युशन आहे असं वाटतं... आमच्या जनरेशनचं ठीक आहे, पण पुढच्या जनरेशनला तरी स्कूलपासूनच मराठी कंपल्सरी केलं पाहिजे!
आणि मग पसायदानाच्या सुरांचे तरंग दूर लोटून देउन मी झोपायला निघुन जातो....