त्यांच्या प्रेमाची शायरी...

प्रसाद शिरगांवकर

ती तयाची वीज होती
तो तिचा होता सखा
चालला संसार होता
मोरपीसा सारखा!

रंग आभाळी जसे
येतात अन जातात ही
दिवस हे येतात जैसे
दिवस ते जातात ही!

(मग काय होतं!)

जी कधी घेऊन आली
जीवनी सौदामिनी
थांबली घेऊन हाती
आज 'बर्गे यामिनी' !

एकदा आयुष्य त्याने
ढवळले होते तिचे
उकळतो आहे अता तो
बाटल्या,वाट्या,बुचे

त्यांचिया हातात येता
बाहुल्या अन खुळखुळे
जे गुलाबी प्रेम होते
आज वाटे खिळखिळे!

एकदुज्यांशी तयांचे
बोलणेही वेगळे
त्यांचिया गप्पांत आता
फक्त चिमण्या - कावळे!

काय ही त्यांची अवस्था
काय ही त्यांची दशा
सर्वदा तांबूस डोळे
ना जरी करती नशा!

समजला आता तयांना
अर्थ प्रेमाचा खरा
समजले आकाश आणिक
समजली आता धरा

लेकरासाठी धरेसम
स्तब्ध असते राह्यचे
अन सदा त्याच्याचसाठी
मेघ असते व्हायचे!

समजता हे सत्य त्यांचे
दुःख सारे लोपले
प्रेमतत्वाने तयांचे
विश्व आता व्यापले

प्रेमतत्वाने तयांचे
विश्व आता व्यापले

Average: 6.9 (248 votes)