चला उठा बंधुंनो आपण
घटना* आता गाढुन टाकू
आप-आपली सेना अथवा
ब्रिगेड आता आपण स्थापू
'घटने'ची ही मुजोर चौकट
तुम्हा अम्हाला हवी कशाला
जसे मानतो तसेच वागू
बघू रोखतो कोण आम्हाला
खुळे कायदे, भली व्यवस्था
मिळून आता मोडुन टाकू
आप-आपली सेना अथवा
ब्रिगेड आता आपण स्थापू
याला मोडा... त्याला फोडा
दात जगाचे घशात घाला
येथे जाळा, तेथे तोडा
दिसे उभे ते कापुन काढा
आम्हास जो जो मानत नाही
मान तयाची छाटुन टाकू
आप-आपली सेना अथवा
ब्रिगेड आता आपण स्थापू
धर्म आमचा... प्रांत आमचा...
जात आमची... मक्तेदारी
जगात आहो अम्हीच अव्वल
अन भवताली डुकरे सारी
हाकलुनिया या डुकरांना
गल्लीत आपले झेंडे रोवू
आप-आपली सेना अथवा
ब्रिगेड आता आपण स्थापू
पदोपदी हे झेंडे रोवुन
देश असा निर्माण करूया
'भारत प्यारा' तोडुन येथे
तालिबान निर्माण करुया
उदंड राहो इथे बंदुका
अन सर्वांच्या हाती चाकू
आप-आपली सेना अथवा
ब्रिगेड आता आपण स्थापू
*घटना - राज्य-घटना (Constitution)