एकदा ज्ञानेश्वरांना
भेटण्या गेलो आम्ही
अडचणी सार्याच अमुच्या
सांगण्या गेलो आम्ही
ज्ञानदेवा वाटते मज
चैन होती आपली
भाजण्या मांडे स्वतःचे
पाठ आपुली तापली
ज्ञानदेवा सांग आम्हा
पाठ कैसी तापते?
(गॅसच्या रांगेत येथे
पाठ आमुची वाकते!)
चूल नाही, गॅस नाही
स्टो सुद्धा आम्हा नको
पाठ ही अमुची पुरावी
आणखी काही नको!
हे तरी सांगा आम्हाला
बोलला रेडा कसा
वेदवाणी तो चतुष्पद
नेमका शिकला कसा?
भोवताली आमच्याही
केवढे रेडे इथे
पांढऱ्या टोप्यांतले हे
केवढे नेते इथे!
वाटते आम्हास त्यांनी
वेद बोलावे कधी
कोणत्याही कारणाने
सत्य जाणावे कधी!
हे नसे, हेही नको
सांगा आम्हाला हे तरी
की कसे गेलात आपण
चालत्या भिंतीवरी?
आगगाड्या, वाहने
काही न येथे चालते
एवढे का? हाय अमुचे
सरकार ही ना चालते!
आपले ऐकून आम्ही
रोज डोके चालवू
या इथे न चालणाऱ्या
सर्व वस्तू चालवू!
ऐकुनी सारेच अमुचे
ज्ञानराया हासले
पाहुनि आमच्याकडे ते
शांत चित्ते बोलले
पाहिजे विश्वास थोडा
आपल्या शक्तीवरी
अन असावी भिस्त सारी
आपल्या भक्तीवरी
काळ तो होता असा की
हे कधी नव्हते कमी
काळ हा आला अता की
हेच ते आहे कमी!
काळ ऐसा येत आहे
गोष्ट ही मी जाणली
एवढ्या साठीच वेड्या
मी समाधी घेतली!