सेक्सलाईफ आणि विवाहबाह्य नाती

प्रसाद शिरगांवकर

(मिडलाईफ क्रायसिसच्या या लेखमालिकेतला हा अत्यंत नाजुक आणि उघडपणे चर्चा न केला जाणारा विषय. कोणताही पूर्वग्रह आणि इझम न बाळगता मांडायचा प्रयत्न करतोय, तशाच खुल्या मनानं हा वाचावा ही विनंती) 
Sex is the foundation of a good marriage and a stable family. एकमेकांवर प्रेम करणारं, एकमेकांची प्रणयाराधना करणारं आणि एकमेकांशी केलेल्या प्रणयामधून अत्यंत समाधानी असणारं जोडपं हा यशस्वी कुटुंबसंस्थेमधला अत्यंत महत्वाचा घटक आहे. 

आपल्याकडे साधारणपणे विशीच्या मध्यापासून ते तिशीच्या मध्यापर्यंत लग्नं होतात. या वयामध्ये स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही अफाट सेक्स ड्राईव असतो. प्रणयातला आनंद उपभोगण्याची विलक्षण इच्छा असते. निसर्गाच्या योजनेनुसार या वयात स्त्री आणि पुरुष दोघंही विलक्षण आकर्षक दिसतही असतात. 

चाळीशी येते. आयुष्याचा मध्य येतो. स्त्रिया मेनोपॉजच्या दिशेनं जायला लागतात. निसर्गतः बहुसंख्य स्त्रियांचा सेक्सचा ड्राईव कमी व्हायला लागतो. बदलत्या वयामुळे स्त्री आणि पुरुष दोघांचीही शरीरं बेढब आणि अनाकर्षक व्हायला लागतात. पंधरा-वीस वर्षांच्या लग्नामध्ये आणि त्यातल्या सेक्सुअल लाईफमध्ये तोच-तोपणा यायला लागलेला असतो. त्याची फ्रीक्वेन्सी आणि त्यातून मिळणारा आनंद झपाट्यानं कमी व्हायला लागलेला असतो. 
खरंतर हे सगळं नैसर्गिक असतं, पण तरीही, या चक्रातून बाहेर पडून फँटसीपूर्ण सेक्सलाईफ पुन्हा अनुभवण्यासाठी मिडलाईफ क्रायसिसमध्ये अडकलेले काही पुरुष अत्यंत डेस्परेटली विवाहबाह्य संबंधांचा आधार घेतात. आपल्याहून खूप कमी वय असलेल्या, अजूनही ऐन तारुण्यात असलेल्या व्यक्तीशी नातं प्रस्थापित करून आपल्या मनातल्या सेक्सुअल आणि रोमॅंटिक फँटसीज अनुभवायचा प्रयत्न करतात. गंमत म्हणजे त्यांच्या आयुष्यातलं यश किंवा त्यांचा स्वभाव बघून, त्यांच्या प्रेमात पडून, राजीखुषीनं त्यांच्याशी नातं जोडणाऱ्या त्यांच्यापेक्षा वयानं खूप लहान असणाऱ्या व्यक्ती त्यांना मिळतातही! 

"आपण अजूनही तरुणच आहोत, आपल्यापेक्षा वयानं खूप लहान असलेल्या तरुणीलाही आपण आवडू शकतो आणि अजूनही आपण आयुष्य पूर्णतः उपभोगू शकतो" हे स्वतःलाच सिद्ध करणं आणि स्वतःचं वाढतं वय नाकारणं अशी एक विलक्षण गंमतशीर प्रेरणा या वागण्यामागे असते. 

आपल्या ह्या नात्याचा (किंवा लफड्याचा) आपल्या जोडीदारावर, मुलांवर आणि एकुणातच आपल्या आयुष्यावर काय परिणाम होईल याचा काहीही विचार न करता, 'सुखं अनुभवण्याची ही आपली पुन्हा एकदा मिळालेली पण आता शेवटची संधी आहे' ह्या एका विचित्र ऊर्मीतून हे केलं जात असावं बहुदा. 

अर्थात कारणं, प्रेरणा, उर्मी काहीही असोत. मिडलाईफ क्रायसिस मधल्या काही (किंवा अनेक) पुरुषांच्या बाबतीत हे घडतं. 

हे आपल्या बाबतीत घडतं आहे का हे वेळीच ओळखायचं कसं? क्षणिक आनंदासाठी आणि फसव्या फँटसीज पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर जपलेल्या नात्यांची मोडतोड करण्यापासून स्वतःला थांबवायचं कसं याविषयी पुढच्या लेखात. 

Average: 8 (1 vote)