इंटिमेट नात्यांमधला क्रायसिस टाळण्यासाठी

प्रसाद शिरगांवकर

करियरमधला मिडलाईफ क्रायसिस टाळण्यासाठी जसे Do’s & Don’ts देता येतात तसं इंटिमेट नात्यांच्या बाबतीत करता येत नाही. ही नाती अत्यंत डायनॅमिक असतात. त्याच्या छटांमध्ये आणि त्यातून येणाऱ्या अनुभवांमध्ये सतत बदल होत असतात. इंटिमेट नात्यांच्या बाबतीतल्या आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये, आपल्याकडून असलेल्या अपेक्षाममध्ये आणि आपल्याही त्या नात्याकडून असलेल्या अपेक्षांमध्येही आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सतत बदल होत असतात. नात्यांच्या या डायनॅमिझमचा सगळ्यांत मोठा फटका मध्यवयात बसण्याची शक्यता असते. इंटिमेट नात्यांच्या बाबतीत आपल्या असलेल्या फँटसीज आणि आपण अनुभवलेलं सत्य ह्या दोन्हींमध्ये जर जबरदस्त फरक असेल तर मध्यवयात त्यातून क्रायसिस निर्माण होण्याची खूप जास्त शक्यता असते. 

सेक्सुअल फँटसीज 

सेक्सविषयी प्रत्येक व्यक्तीच्या मनात काही फँटसीज असतात. विशिष्ट प्रकारे केलेला सेक्स, विशिष्ट प्रकारच्या व्यक्तिबरोबर केलेला सेक्स, विशिष्ट वेळी किंवा ठिकाणी केलेला सेक्स अशा एक ना अनेक प्रकारच्या फँटसीज आपल्या आत कुठेतरी दडलेल्या असतात. तरुण वयात बघितलेल्या ब्लू फिल्म्स पासून ते सध्या जगभर धुमाकूळ घालणाऱ्या व्हॉट्सऍपवरच्या ‘क्लिपां’पर्यंत अनेक वेगवेगळ्या गोष्टींनी या फँटसीज तयार झाल्या असतात किंवा यांना खतपाणी घातलेलं असतं. अर्थात फँटसीज तयार होण्यामध्ये पॉर्नोग्राफी हा एक मोठा घटक असला तरी तो एकमेव नसतो. तरल रोमँटिक सिनेमे बघून आणि कादंबऱ्यां वाचून किंवा इतर कोणाच्या सेक्सलाईफ बद्दल ऐकूनही कळत नकळत काही फँटसीज तयार झालेल्या असतात. 

या फँटसीज पूर्ण करण्याचा एक अफाट ड्राईव अनेकांना चाळीशीमध्ये येतो. खरंतर त्यांचं जोडीदाराशी पटत नसतं असं नाही. त्यांना त्यांच निवडलेला एकच एक जोडीदार हवाच असतो. त्यांना कुटुंब आणि स्थैर्य दोन्ही हवंच असतं. त्यांना सुरु असलेल्या संसारात आणि आयुष्यात कोणत्याही प्रकारचा राडा नको असतो. पण आपल्या सेक्सलाईफमधल्या अतृप्त इच्छा भागवण्यासाठी थोडीच वर्षं राहिली आहेत अशी एक रुखरुखही मनात दाटायला लागली असते. 

ही रुखरुख, हा ड्राइव ज्यांच्यावर स्वार होतो, ते लोक 'मसाज पार्लर’ला जाण्यापासून ते फक्त मित्र-मित्रच बँकोकच्या ट्रिपवर जाण्यापर्यंत सामाजिक दृष्ट्या ‘सेफ’ उपाय करून बघतात. याशिवाय ज्यांना शक्य असतं आणि जमतं ते पुढचा मागचा विचार न करता जिथे ‘तेरी भी चुप, मेरी भी चुप’ राहील असे विवाहबाह्य संबंध साधण्याचाही प्रयत्न करतात. 

'चाळीशी पर्यंत अतृप्त राहिलेल्या आपल्या सेक्सुअल फँटसीज पूर्ण करण्यासाठी आपला विवाहित जोडीदार सोडून बाहेर कुणाकडे जावं का जाऊ नये?’ या प्रश्नाचं एकच एक सरधोपट उत्तर माझ्याकडे नाही. 
प्रत्येकाची नीतीमत्तेची आणि मूल्यांची स्वतःची एक चौकट असते (नसेल तर ती असावी), त्या मूल्यांच्या चौकटीमध्ये राहून जे करावंसं वाटेल, जे करणं जमेल ते प्रत्येकजण करतोच. 

"आपली मूल्यांची चौकट आपल्या जोडीदारानंही अंगिकारली तर आपल्याला चालेल का?” हा एकच प्रश्न स्वतःला विचारावा आणि त्याचं उत्तर होकारार्थी असेल तर बिनधास्त जे करावंसं वाटतं ते करावं! 
याशिवाय, "सेक्सच्या बाबतीत माझ्या खूप फँटसीज आहेत, ज्या माझ्या बायकोकडून पूर्ण होत नाहीत” अशी तक्रार करत अतृप्त समंधासारख्या वागणाऱ्या पुरुषांनी स्वतःला काही प्रश्न विचारावेत 

  • मला जशा फँटसीज आहेत, तशा माझ्या बायकोलाही असू शकतात हे मला मान्य आहे का?
  • माझ्या फँटसीज तिला सांगण्याचा आणि तिच्या जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला आहे का?
  • ‘सेक्समुळे तुला समाधान मिळालं का? ऑर्गझम येतो का?’ हा प्रश्न मी कधीतरी माझ्या बायकोला विचारला आहे का?
  • जर तिला समाधान मिळत नसेल, ऑर्गॅझम येत नसेल तर तो यावा म्हणून मी काही प्रयत्न केले आहेत का? 
  • मुळात सेक्ससारख्या अत्यंत महत्वाच्या विषयाच्या बाबतीत आमच्या दोघांमध्ये प्रामाणिक आणि मनमोकळा संवाद होतो का?

असे अनंत प्रश्न आहेत. 

‘माझ्या फँटसीज पूर्ण होत नाहीत / झाल्या नाहीत’ अशी तक्रार असणाऱ्या प्रत्येकानं स्वतःला हे प्रश्न विचारावेत आणि त्यांची उत्तरं प्रामाणिकपणे शोधावीत. 
सेक्स हे मनमुराद समाधान ओरबाडण्याचं साधन नाही. जेवढं देऊ तेवढंच मिळण्याची एक विलक्षण भन्नाट सिस्टिम आहे ही! 

'मला जे हवं ते मिळत नाहीये' म्हणून रडत राहून, जे हवं ते मिळवण्यासाठी, आयुष्यात अफाट क्रायसिस निर्माण करण्यापूर्वी, ‘मी जे शक्य आहे ते सर्व माझ्या जोडीदाराला देतो आहे का? तिच्या फँटसीज आणि समाधानासाठीही झटतो आहे का?’ याचाही विचार करायलाच हवा.

हे करत नसू तर करायला हवं… करत असू तर करत रहायला हवं… 

कारण हे करत राहिलो तर सेक्सच्या बाबतीतला मिडलाईफ क्रायसिस आपल्या आसपासही येणार नाही! 

Average: 9 (2 votes)