मिडलाईफ क्रायसिस ओळखायचा कसा?

प्रसाद शिरगांवकर

मिडलाईफ क्रायसिस कशामुळे येऊ शकतो आणि त्यामुळे आयुष्यात काय उलथापालथ आपण करू शकतो हे गेल्या तीन लेखांमध्ये लिहिलं. आता आपल्याला मिडलाईफ क्रायसिस होतो आहे हे ओळखायचं कसं आणि त्याविरुद्ध उपाययोजना करायची कशी या बद्दल. 

मुळात एक गंमत अशी की 'मिडलाईफ क्रायसिस' नावाचा कोणताही मानसिक आजार नाही! मिडलाईफ किंवा आयुष्याचा मध्यकाल ही निसर्गतः येणारी आयुष्यातली अवस्था आहे. या अवस्थेमध्ये असताना ज्या प्रेरणा असतात, जी प्रेशर्स असतात त्यांना अनुसरून आपण काही ड्रास्टिक निर्णय घेउ शकतो आणि त्या निर्णयांमुळे आयुष्यात भीषण वादळं किंवा क्रायसिस येऊ शकतात. म्हणून या सर्व प्रकाराला मिडलाईफ क्रायसिस असं म्हणतात. 

तसंच मिडलाईफ क्रायसिस हा कोणत्याही एका क्षणी किंवा एका दिवशी सुरु होत नाही. म्हणजे काल नव्हता, आज अचानक झाला असं होत नाही. ही अनेक दिवस, महिने, कदाचित काही वर्षं चालणारी अखंड आणि सततची प्रक्रिया असते. एखाद्या तात्कालिक कारणाने किंवा मोठ्या प्रसंगाने ती लक्षात येऊ शकते, पण बराच काळ सुरु असलेल्या एखाद्या किंवा अनेक अंतर्प्रवाहांमुळे ती घडलेली असते. 

मिडलाईफ क्रायसिस हा एक विशिष्ट आजार नसेल आणि तो अचानक न होता बराच काळ आपल्या आत सुरु असलेल्या प्रवाहांमुळे होत असेल, तर आपल्या आयुष्यात मिडलाईफ क्रायसिस होतो आहे का किंवा होण्याचा धोका आहे का हे ओळखायचं कसं? 

बहुसंख्य माणसांच्या मिडलाईफ क्रायसिसची सुरुवात मध्यवयात येऊ शकणाऱ्या Psychological Depression किंवा Anxiety मुळे होते. 

आपल्याला डिप्रेशन आलंय हे ओळखायचं कसं? 

  • जर आपल्याला विनाकारण उदास वाटत असेल. एखाद दोन दिवस नाही, तर दिवसेनदिवस, महिनोनमहिने काहीही कारण नसताना उदास, मूड डाऊन, दुःखी, निराश, पराभुत वाटत असेल तर
  • अचानक आयुष्य निरर्थक वाटायला लागलं असेल, आपण कोण आहोत, काय करतो आहोत, का जगतो आहोत असं सतत सतत वाटत असेल तर
  • आपण अत्यंत युसलेस आणि वर्थलेस आहोत असं वाटत असेल, स्वतः खूप छोटे, निरुपयोगी, कस्पटासमान वाटत असू तर
  • रोजच्या साध्या साध्या गोष्टींमध्ये काहीच आनंद वाटत नसेल आणि आयुष्यात मोठं काही घडलं तर त्याचाही आनंद वाटत नसेल, मुळात कोणत्याच कारणाने काहीच आनंद वाटत नसेल तर

हे असं काही आपल्या आयुष्यात दिवसेनदिवस, महिनोनमहिने घडायला लागलं की आपल्याला मानसशास्त्राच्या भाषेत ‘डिप्रेशन' आलेलं असतं. मध्यवयात जेंव्हा असं डिप्रेशन येतं, तेंव्हा ते तोडून त्यातून बाहेर पडण्यासाठी, पुन्हा स्वतःविषयी आणि आयुष्याविषयी बरं वाटण्यासाठी माणसं अत्यंत टोकाच्या कृती करतात, ड्रास्टिक निर्णय घेतात. आणि टोकाच्या कृती किंवा ड्रास्टिक निर्णयांमुळे क्रायसिस तयार व्हायची शक्यता असते, अन बहुसंख्यवेळा तो होतोच. 

तर आयुष्यातला मिडलाईफ क्रायसिस टाळायचा असेल तर मध्यवयात येऊ शकणारं किंवा आलेलं मानसिक डिप्रेशन ओळखता यायला पाहिजे. त्याची लक्षणं दिसली की न लाजता योग्य त्या मानसोपचार तज्ज्ञाकडे गेलं पाहिजे. आणि आपल्या डिप्रेशनवर उपचार करून घेतला पाहिजे. तज्ज्ञांचं काउंसेलिंग किंवा औषधोपचारानं मानसिक डिप्रेशनमधून तीन-चार महिन्यांत बाहेर येणं शक्य असतं. ते केलं नाही तर डिप्रेशनमध्ये घेतलेल्या निर्णयांमुळे आयुष्यात क्रायसिस येण्याची शक्यता असते. आपल्याला काय हवंय हे आपण ठरवावं! 

अनेक जणांना आपलं डिप्रेशन लक्षात येत नाही, लक्षात आलं तरी ते महत्वाचं वाटत नाही, महत्वाचं वाटलं तरी मनाच्या डॉक्टरकडे जाण्याची लाज वाटते किंवा आपलं आपण मॅनेज करू असं वाटतं. यापैकी काहीही एक परिस्थिती असेल आणि आपल्याला मध्यवयात येऊ शकणाऱ्या डिप्रेशनमधून मिडलाईफ क्रायसिस निर्माण होऊ द्यायचा नाही अशी इच्छा असेल तर काय करावं? या विषयी पुढच्या लेखामध्ये! 

Average: 9 (2 votes)