"च्यायला निम्मं आयुष्य संपलं आपलं आणि कुठे आहोत आपण? हे काय करतो आहोत?" अशी एक सणसणित जाणीव आपल्याला तिशीच्या शेवटी किंवा चाळीशीच्या सुरुवातीला कधीतरी होते. (३५व्या किंवा ४०व्या वाढदिवसाला तर होतेच होते.)
आपण सत्तर-ऐंशी वर्षं जगू अशी आशा असते, म्हणजे ३५ किंवा ४० म्हणजे बरोबर आयुष्याचा मध्यबिंदू. लहानपणी आणि तरुणपणी आयुष्याविषयी अनेक स्वप्नं बघितलेली असतात. काही सोडून दिली असतात, काही मिळवण्यासाठी वर्षानुवर्षं अहोरात्र मेहनत घेतलेली असते.
आयुष्याचा मध्यबिंदू आल्याची जाणीव झाली की अचानक 'आपल्याला जे हवं होतं ते मिळालंय का?' आणि 'जे करायचं होतं तेच करतो आहोत का?' हे प्रश्न अतोनात छळायला लागतात. ह्या दोन प्रश्नांच्या बरोबरच, 'मी खरोखर यशस्वी झालो आहे का?' हाही एक प्रश्न अफाट टोचणी द्यायला लागतो.
यातल्या कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर 'नाही' असं आलं की, 'जे हवं ते मिळवण्याची', 'जे वाटतं ते करण्याची' किंवा आपल्या कल्पनेनुसार 'यशस्वी होण्याची' अफाट ऊर्मी मनात दाटून येते. अन हे करण्यासाठी आपल्या उरलेल्या आयुष्यातली दहा-वीस वर्षंच आपल्या हातात आहेत असं वाटून एक अफाट डेस्परेशन येतं.
मग या डेस्परेशनच्या पोटी आपल्याला नोकरी सोडून धंदा करावासा वाटतो. धंदा करत असू तर त्याला जोडधंदा करावासा वाटतो. किंवा नोकरी-धंदा तसाच ठेवून एखादी NGO काढून समाजसेवा करावीशी वाटते. किंवा NGOच चालवत असू तर राजकारणात जावंसं वाटतं.
काहीही करून डेस्परेटली आपलं करियर बदलून प्रचंड पैसा किंवा प्रसिद्धी किंवा समाधान किंवा हे तिन्ही मिळवावं असं आपल्याला वाटतं. आणि त्यासाठी आपण आपलं आणि आपल्या कुटुंबाचं आयुष्य स्टेकला लावायला तयार होतो, आणि लावतोही...
आपण भूतकाळात पाहिलेली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी, आपला सुस्थिर वर्तमान डावाला लावून, उज्वल भविष्याची कामना करत रहाणं, हे फक्त मिडलाईफ क्रायसिस मुळे घडतं!
हे सगळ्यांच्या आयुष्यात घडतंच असं नाही. पण आपल्या आयुष्यात घडलं तर ते मॅनेज कसं करायचं याविषयी पुढच्या लेखात.