आयुष्याचा मध्य प्रत्येकालाच येतो. त्या मध्यवयातल्या प्रेरणा आणि प्रेशर्स ही तोवर कधीही न अनुभवलेली आणि वेगळी असतात. या प्रेरणा आणि प्रेशर्सपोटी आपण आयुष्याला कलाटणी देणारे किंवा आयुष्याची उलथापालथ करणारे निर्णय घेऊ शकतो. आणि या निर्णयांमुळे आपल्या मिडलाईफमध्ये वादळं आणि क्रायसिस निर्माण होऊ शकतो.
मध्यवयात तोवर न अनुभलेल्या प्रेरणा आणि प्रेशर्स बहुसंख्य माणसांच्या आयुष्यात येतातच. त्यापोटी निर्णय घेऊन आयुष्यात क्रायसिस निर्माण होऊ नये यासाठी आपण काय करू शकू याचं हे मुक्त चिंतन.
करियर मधला क्रायसिस टाळण्यासाठी
मिडलाईफमध्ये नोकरी सोडून धंदा करावासा वाटणं, किंवा धंद्यात मोठा बदल करावासा वाटणं वगैरे सारख्या प्रेरणा मनात येऊन आपल्या करियरमध्ये आमूलाग्र बदल घडवावासा वाटतो. आपण जे करतो आहोत त्यापेक्षा खूप वेगळं, खूप जास्त पैसा किंवा प्रसिद्धी मिळवून देणारं, किंवा खूप जास्त समाधान देणारं काहीतरी करावं असं मनापासून वाटतं.
मुळात ही प्रेरणा वाईट नाही. आपल्या आयुष्यात अफाट सकारात्मक बदल घडवण्याची क्षमता या प्रेरणेमध्ये आहे.
पण, नोकरी सोडून धंदा करण्याची, धंदा सोडून समाजसेवा करण्याची, समाजसेवा सोडून राजकारणात उतरण्याची आपल्यात क्षमता आहे का आणि उतरलो तर काय होईल याचा सारासर विचार न करता आपण उडी घेतो.
प्रेरणा वाईट नसते, बदल चुकीचा नसतो, पण पुरेसा आणि सारासर विचार करता उडी मारणं यानं क्रायसिस निर्माण होऊ शकतो.
मध्यवयामध्ये नोकरी किंवा धंद्यामध्ये बऱ्यापैकी यशस्वी झालेला माणूस हा बऱ्यापैकी एकाकी असतो. मनातले विचार बोलायची, त्यावर फीडबॅक घ्यायची, विचारविनिमय करून निर्णय घ्यायची कोणतीही सपोर्ट सिस्टिम नसते. शिवाय 'आपण १५-२० वर्षं नोकरी-धंदा करतोय, आपल्याला यातलं सगळंच समजतं, आपल्याला कोणी काही शिकवू शकत नाही' असा एक गंडही मनात तयार झालेला असतो.
आपल्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवावासा वाटण्याची प्रेरणा आणि आपल्याला सगळं समजतंय हा गंड हे दोन्ही एकत्र आले की काय वाट्टेल ती उडी मारली जाते. कधी ती जमते, कधी फसते. आणि फसली की क्रायसिस निर्माण होतो.
हे टाळण्यासाठीचा एकमेव उपाय म्हणजे, आयुष्यात काहीही आमूलाग्र बदल करावासा वाटला तर, योग्यवेळी योग्य क्षेत्रांमधल्या तज्ज्ञांची मदत घेणे. त्याचबरोबर, आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांचीही मदत घेणे. हे दोन्ही केलंच पाहिजे.
मानसोपचारतज्ज्ञ, बिझनेस कोच, काउंसेलर्स, मेंटोर्स असोत किंवा जिवलग मित्र, आई-वडील-बायको-भाऊ-बहिणी-शेजारी कोणीही जवळची माणसं, ह्या सगळ्यांची मतं आणि inputs महत्वाचे असतात.
व्यावसायिक क्षेत्रातला एखादा खरोखरीचा तज्ज्ञ माणूस आणि आपल्यावर जिवापाड प्रेम करणारा एखादा जिवलग माणूस, अशा किमान दोन माणसांशी चर्चा केल्याशिवाय, दोघांशी विचारविनिमय केल्याशिवाय मध्यआयुष्यातला करियर विषयीचा कोणताही महत्वाचा निर्णय घ्यायचा नाही हे इतकंच आपण ठरवलं आणि पाळलं तर मिडलाईफ मध्ये सकारात्मक बदल घडवताना क्रायसिस येण्याची शक्यता खूपच कमी होते...
करून बघा!