आयुष्यात मला जे करावंसं वाटत होतं ते करण्यासाठी, अनुभवावंसं वाटत होतं ते अनुभवण्यासाठी, 'The time is NOW or NEVER' अशी एक अत्यंत तीव्र भीती आणि विलक्षण प्रेरणा मध्यआयुष्यात कधी तरी दाटून येते. कोणाला एखाद्या क्षणी साक्षात्कार झाल्यासारखी होते तर कोणाच्या मनात कणाकणानं साठत साठत एखाद्या क्षणी ओसंडून वहायला लागते.
मिडलाईफ मध्ये घेतल्या गेलेल्या बहुसंख्य ड्रास्टिक निर्णयांच्यामागे 'नाऊ ऑर नेव्हर' ची भीती कम प्रेरणा असते.
अर्थात ह्या प्रेरणेमुळे काही जणांच्या आयुष्यात अत्यंत सकारात्मक बदलही घडतात.
या वयात वजनकाट्यावरचा आकडा, ढेरीचा आकार किंवा सहज म्हणून केलेल्या शुगर, कोलेस्ट्रॉल किंवा ECG रिपोर्टमधून एक वेक-अप कॉल येतो आणि माणसं फिटनेसच्या मागे लागतात. त्यासाठी जिम लावतात, चालायला लागतात, पळायला लागतात, सायकली घेतात, ट्रेक्सना जातात, डाएट करतात, योगापासून झुंबापर्यंत कोणतेही क्लासेल लावतात. काय वाटवाटेल ते करतात.
आळशी, लेडबॅक, निवांत लाईफस्टाईल बाजूला सारून, झटझटून आरोग्यपूर्ण जीवशैलीच्या मागे लागतात. आपण विशी-तिशी सारखे निरोगी आणि फिट असण्या-दिसण्याचा प्रयत्न करायला लागतात. कितीही गंमतशीर वाटलं, तरी मिडलाईफमधल्या प्रेशर्स आणि प्रेरणांमुळे होणारा हा एक सकारात्मक बदल आहे.
याच 'नाऊ ऑर नेव्हर'च्या प्रेशरमुळे, काहीजणं जुने हरवलेले छंद पुन्हा नव्यानं जोपासायला लागतात. माळ्यावर ठेवलेली गीटार किंवा हार्मोनियम काढून पुन्हा त्यावर बोटं फिरवायला लागतात, शाळा सुटल्यावर सोडलेला कथ्थक किंवा भरतनाट्यमचा क्लास पुन्हा लावतात, चकचकित नवा DSLR कॅमेरा घेऊन फोटो काढायला लागतात, चित्र काढायला लागतात, कॅलिग्राफीच्या क्लासला जातात, घरी कुकिंग-बेकिंग करायला लागतात. लहानपणी करावंसं वाटणारं, पण तरुणवयात करता न आलेलं कोणतंही स्वप्न, छंद, पॅशन पुन्हा एकदा शोधून ती पूर्ण करायचा प्रयत्न करायला लागतात...
आपल्या आरोग्याविषयी जागृत होऊन फिटनेस सांभाळणं आणि आवडींविषयी जाणीव होऊन छंद-पॅशन्स सांभाळणं हे दोन्ही मिडलाईफमधल्या प्रेशर्स आणि प्रेरणांमुळे होऊ शकणारे सकारात्मक बदल...!!
हे दोन्ही जमू शकलं तर मिडलाईफ मध्ये आयुष्यात 'क्रायसिस' न येता नव्या आयुष्याचं 'जेनेसिस' होऊ शकतं!
करियर आणि नात्यांच्या बाबतीतही आपण अफाट असमाधानी आहोत अशी भावना मिडलाईफमध्ये येऊ शकते. ह्या दोन्हीमधलं असमाधान दूर करून त्यात यश आणि समाधान मिळवण्यासाठी 'The time is NOW or NEVER' असं आपल्याला वाटू शकतं अन त्यातून आयुष्याची दिशा ठरवणारे निर्णय आपण घेऊ शकतो.
मिडलाईफमध्यल्या 'नाऊ ऑर नेव्हर'च्या भीती कम प्रेरणांमधून आपण खडबडून जागे होऊन जे झटझटून निर्णय घेतो, ते आयुष्यात 'क्रायसिस' निर्माण करणारे असावेत का नव्या आयुष्याचा 'जेनेसिस' हे मात्र आपल्या हातात असतं!
आपल्याला मिडलाईफ असणारच आहे, त्यात नाऊ ऑर नेव्हरची प्रेशर्स आणि प्रेरणा असणारच आहेत, त्यापोटी कोणते निर्णय घ्यावेत हे आपल्या हातात आहे. अन त्या निर्णयांपोटी क्रायसिस निर्माण करायचे का जेनेसिस हेही आपणच ठरवायचं आहे!!
हॅपी मिडलाईफ!