सध्या पुरुषांच्या 'मिडलाईफ क्रायसिसचं' प्रमाण प्रचंड वाढलं आहे असं ऐकतो, वाचतो आणि बघतोही आहे. मिडलाईफ क्रायसिस म्हणजे आयुष्याच्या मध्यावर, म्हणजे साधारण ४० ते ५० वर्षे वयोगटामध्ये, आयुष्यात येऊ शकणारं अफाट भावनिक वादळ आणि त्यामुळे होऊ शकणारी आयुष्याची उलथापालथ.
होतं असं की, हा पुरुषांच्या करीयरचा पीक पिरीयड असतो. दहा-पंधरा वर्षं जी नोकरी-व्यवसाय करत असतो त्यात अफाट प्रगतीच्या किंवा भीषण अधोगतीच्या शक्यतांचे दिवस असतात. आपण करीयर बाबतीत घेतलेल्या बऱ्या-वाईट निर्णयांचे भले-बुरे परिणाम समोर दिसत असतात. त्यातून आयुष्यात कितपत समृद्धी असणार किंवा नसणार आहे हे समोर स्पष्ट दिसत असतं.
याचवेळी, जिच्याबरोबर दहा-पंधरा वर्षं संसार केला, त्या बायकोची रजोनिवृत्तीच्या दिशेनं वाटचाल सुरू झालेली असते. त्यामुळे तिच्यात होणाऱ्या हार्मोन्सच्या बदलांमुळे ती मूडी आणि चिडचिडी झालेली असते. तिच्या आणि आपल्या शरीरात होणाऱ्या बदलांमुळे आपल्या 'सेक्स-लाईफ'मध्ये बदल व्हायला लागलेला असतो. त्या लाईफशी आणि मुख्यतः तिच्याशी कसं डील करायचं हे समजत नसतं, पण तरीही ती आनंदी राहील आणि आपल्यालाही आनंदात ठेवेल म्हणून आपण झटत असतो ते असतोच.
याचवेळी, ज्यांच्यावर जिवापाड प्रेम करतो ती आपली मुलं पौगंडावस्थेत यायला लागली असतात. त्यामुळे त्यांच्याही हार्मोन्समध्ये बदल होत असतात आणि तेही मूडी आणि चिडचिडे बनत असतात. त्यांच्याशी कसं डील करायचं हे समजत नसतं. पण त्यांच्या भविष्याची तजवीज करण्यासाठी आपण झटत असतो ते असतोच.
याचवेळी, आई-बाप निवृत्त आणि म्हातारे झालेले असतात. त्यांच्या तब्येतीच्या तक्रारी सुरू झालेल्या असतात अन त्यांची म्हातारपणाची कुरबुर सुरू झालेली असते. त्यांच्या तक्रारींशी कसं डील करायचं हे समजत नसतं. पण त्यांच्या आरोग्यपूर्ण आयुष्याची तजवीज करण्यासाठी आपण झटत असतो ते असतोच.
ही सगळी कौटुंबिक, भावनिक, आर्थिक जबाबदारी पेलता पेलता अनेक मध्यवयीन किंवा मिडलाईफमधले पुरुष पिचून, थकून जातात. आणि तेंव्हाच त्यांच्या आयुष्यात 'मिडलाईफ क्रायसिस' येतो.
असा मिडलाईफ क्रायसिस आला की काही पुरुष अफेअर करण्यापासून ते घरदार विकण्यापर्यंत काहीही करू शकतात...
हे असं का होतं आणि ते कसं सांभाळायचं याविषयी पुढच्या लेखात...