'आमचे येथे सर्व प्रकारची भुतं, पिशाच्च इ ठोक तसेच किरकोळ भावात कॉम्प्युटराईज्ड पद्धतीने उतरवून मिळतील' स्वामी चंद्रकुमार जोशी (BE Comp, US Returned)
(सूचना: वाड्यात चौकशी करत बसू नये, अपमान होईल. कुठेही काहीही चौकशी न करता डाव्या हाताच्या जिन्याने दुस या मजल्यावर येणे.
उपसूचना: जिन्याची पाचवी पायरी झिजलेली आहे.)
या जोशाच्या सूचना संपतच नाहीयेत, मी मनात म्हणालो. दारावरची पाटी आणि त्या खालच्या सूचना वाचून मी अगदी योग्य ठिकाणी पोचलो आहे अशी मला खात्री झाली. चिमाची आई म्हणालीच होती की बाजीराव रोडनी शनिवारवाड्याकडे जायला लागलं की 'सकाळ'कडे न वळता 'शारदा'च्या बोळात शिरलं की डावीकडचा तिसरा वाडा. तशी त्यांनी दक्षिणमुखी मारुती ही पण एक खूण सांगितली होती पण मी तिकडे दुर्लक्ष केलं. काय आहे, मी पुण्यात नवीन नवीन आलोय आणि या मंदिरांच्या नावानी माझा सॉलिड गोंधळ होतो. परवाच या देशपांड्यांचाच पत्ता शोधताना मी पासोड्या विठोबापासून जिलब्या गणपतीपर्यंत हिंडून सर्व गल्लीबोळांमधे खुन्या मुरलीधर शोधत बसलो होतो! बरं शोधाच्या भरात ज्या कुठल्या वाड्यात शिरावं तिथे एखाद दोन देशपांडे सापडायचेच. शेवटी विचारत विचारत खुन्या मुरलीधर सापडल्यावर तिथल्या कोणीतरी सांगितलं की 'तो दातपाड्या देशपांडे ना तो भिकारदास मारूतीपाशी रहातो'. आता डेंटिस्टला दातपाड्या म्हणणं हे केवळ सदाशिव पेठेतच शक्य आहे. असो, तर सांगायचा मुद्दा असा की देवळांच्या नावांनी होणार्या माझ्या गोंधळावर मात करून मी या कॉम्प्युटराईज्ड जोशाच्या वाड्यात पोचलो होतो.
तुमच्या सगळ्यांसारखाच माझाही या बुवा, बाबा, महाराज लोकांवर फारसा विश्वास नाही आणि शिवाय माझ्या सारख्या साध्या सरळ माणसाचा भुताखेतांशीही फारसा संबंध येत नाही. अहो, नुकताच पुण्यात येऊन शारदा सहकारी बँकेत ९ ते ५ खर्डेघाशी करणार्या माणसाला कसली माहित असणार हो भुतं खेतं! मला कामाचा ढीग देउन त्रस्त करणारे हेडक्लार्क गोडांबे आणि रोज केस मोकळे सोडून तूफान मेकप करून येणाऱ्या ब्रँच मॅनेजर जगदाळे बाई यांच्यापलिकडे मला कुठलाच समंध आणि पिशाच्च माहित नाही. तर, माझा इतर भुताखेतांशी काहीही संबंध नसताना मी या भुतं उतरवणाऱ्या काँप्युटराईज्ड जोशाकडे कसाकाय हा प्रश्न तुम्हाला पडणं स्वाभाविकच आहे (पडला नसेल तर आता पडू द्या नाहीतर ही गोष्ट पुढे सरकायची नाही!)
त्याचं असं झालं की परवा मी देशपांडे काकांकडे गेलो होतो ना (तेच ते दुसऱ्यांचे दात कोरून पोट भरणारे!), तेंव्हा माझ्यावर फारच दारूण प्रसंग ओढावला. देशपांडे काका माझ्या पपुपिंचे (परम पूज्य पिताजी) जुने मित्र. आमच्या आमानी (आदरणीय माताजी) तयार करून माझ्या बरोबर दिलेले बेसनाचे लाडू त्यांचापर्यंत पोचवण्याची जोखमीची जबाबदारी माझ्यावर होती. पुण्याच्या गल्लीबोळांमधून मोठ्या हिकमतीनं मी त्यांचा पत्ता कसा शोधून काढला हे मी वरती सांगितलंच आहे. साधारण संध्याकाळच्या सुमारास मी त्यांच्या Apartment च्या बाहेर पोचलो. तिथेही अगदी साधीच पुणेरी पाटी होती 'दातांचा दवाखाना चालू आहे' (आणि या पाटीखाली कोणा चावट पुणेकरानं लिहिलं होतं... दवाखान्यातली मुलगीही 'चालू` आहे) मी Apartment मधे शिरल्यावर असं लक्षात आलं की देशपांडे काकांचा घरातच दवाखाना होता. हॉलमधे एका टेबलामागे एक मुलगी बसली होती, ती बहुदा त्यांची receptionist असावी. (आता इथे मी त्या तरुणीचं डीटेल मधे वर्णन करावं अशी काही चावट वाचकांची अपेक्षा असेल. पण मी काही वर्णन बिर्णन करणार नाहीये! सदाशिव पेठेमधल्या डेंटिस्टकडे कोणत्या प्रकारची receptionist असू शकते यावर प्रत्येकानं आपापली कल्पनाशक्ती लढवावी!) तर ही टेबलामागची रिसेप्शनिस्ट बया मान खाली घालून धपाधप काहीतरी लिहित बसली होती. मी पुढे झालो
'Excuse Me', अस्मादिक
'हुं.... ', बया (मान वर न करता)
'ते ... ते डॉ देशपांडे...'
'आहेत... वेळ लागेल', बयेची मान अजून खालीच...
'अहो पण मला ... म्हणजे... भेटायचंय त्यांना... personal काम आहे'
'इथे सगळेच त्यांना भेटायला येतात... हे टोकन घ्या आणि बसा, तुमचा नंबर आला की बोलावतील', बयेची मान अजूनही खालीच...
मी मुकाट्यानं तिनं दिलेलं टोकन (एक पुठ्ठ्याचा जीर्ण झालेला तुकडा) घेतलं आणि बसून बसून खड्डे पडलेल्या एका सोफ्यावर जाउन बसलो. तिथल्या टीपॉयवर चाळून चाळून गलितगात्र झालेली चारेक महिन्यांपूर्वीची मायापुरी, India Today वगैरे मासिकं होती. (ही मासिकं देशपांडे hair cutting saloon वाल्यांकडून second hand विकत घेत असावेत!) बसल्या बसल्या मी सहजच हातातलं टोकन पाहिलं आणि उडालोच. टोकनवर ६३ नंबर होता. मी परत डोळे चोळून खोलीत सगळीकडे पाहिलं, टेबलमागे बसून धपाधप लिहित सुटलेली ती बया आणि मी सोडून खोलीत कोणीच दिसत नव्हतं. बरं देशपांडे काका आतमधे बासष्ट लोकांचे दात एकदम तपासत असतील हे जरा अती वाटलं, पण रिसेप्शन वरच्या बयेला काही विचारण्यात अर्थ नव्हता, ती बया लिखाण सोडुन वर बघायलाही तयार नाही... तेवढ्यात आतल्या खोलीतून आवाज आला.... 'नंबर बासष्ट... ', मी इकडे तिकडे पाहिलं.... कोणी नव्हतंच तर जाईल तरी कसं कोण! परत एका मिनिटानी आवाज आला, 'नंबर बासष्ट... ', परत एक मोठा pause... कुठेही काहीही हालचाल नाही. मग आवाज आला, 'नंबर त्रेसष्ठ... ', हुश्श... सुटलो, मी उठून आत जायला लागलो
'टोकन इथे ठेवून जा', टेबल मागून आवाज आला
'आँ .... ', मी चमकलो.
'म्हणलं टोकन इथेच ठेवून जा'
'अहो पण... ', माझा एक केविलवाणा प्रयत्न...
'अहो पण काय? टोकन कशाला पाहिजे तुम्हाला आतमधे, दात तपासायचेत का टोकन?',
त्या बयेनं एकदाचं वर बघितलं. इतक्या वेळात पहिल्यांदाच मला तिचा चेहरा दिसला (आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला... इ. इ. इ.! आता इथे पुन्हा एकदा आपापल्या कल्पनाशक्तीला वाव देउन एक सुंदर चेहरा imagine करा! तेवढेच माझे कष्ट कमी)
'अहो मॅडम पण मला... '
'ठेवा म्हणलं ना इथे... तेवढं एकच टोकन आहे आमच्याकडे... तुम्ही आत गेल्यावर दुसरं कोणी आलं तर त्यांना काय देऊ मी? '
'अहो पण ते आत्ताच आतमधुन बासष्ठ बासष्ठ असं ओरडत होते त्याचं काय? '
'तुम्हाला कशाला हव्या नसत्या चौकशा... ठेवा ते टोकनं इकडे, माझ्या लिखाणात उगाच जास्त व्यत्यय आणू नका... ', बयेनं आता रुद्रावतार धारण केला!
'काय झालं गं चिमे', आतून एक मध्यमवयीन गृहस्थ बाहेर येत येत म्हणाले. हेच बहुदा देशपांडेकाका असावेत. देशपांडेकाकांची personality अलोकनाथछाप typical मुलीचा बाप type होती!
'बघा ना हो बाबा... हे टोकनच परत देत नाहियेत'
आयला ही धपाधप लिहिणारी बया, चिमा का उमा का कोण, ही या देशपांडेकाकांची मुलगीच आहे का काय? संपलं आता हिनं काही उलट सुलट सांगितलं तर काका भूल न देता माझे दात उपटून हातात देतील. पण तसं काही झालं नाही. तिच्याकडे दुर्लक्ष करून काकांनी शांतपणे माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले
'या, आपण आत बसून बोलुया'
त्यांच्याबरोबर आत जाताना मला माझी ओळख करून द्यायची संधी मिळाली. आपल्या जुन्या मित्रानं आठवण ठेवून बेसनाचे लाडू पाठवल्याबद्दल काकांना भरूनच आलं (हो, आणि बेसनाचे म्हणल्यावर चावायला बरे असा एक डेंटिस्टी विचार मी करून टाकला!) काकांनी आतून काकुंना बोलवून माझी ओळख करून दिली. मग त्या दोघांबरोबर चहा घेता घेता मी बिचकत बिचकत विषय काढला...
'काका... नाही म्हणजे... तसं काही नाही... पण चिमा जरा... '
चिमाचं नाव काढताच काकूंनी निरूपा रॉयची पोझ घेउन डोळ्यांना पदर लावला. काकांनीही अलोकनाथच्या चेहऱ्यावरची सगळी असहायता, दु:ख, लाचारी इ.इ. चेहऱ्यावर आणून मला सांगितलं...
'अरे काय सांगणार तुला सदु, चिमा आमची एकुलती एक मुलगी... तिचीच तर सतत काळजी लागून राहिली आहे.'
'काळजी... कसली काळजी... चांगली अभ्यासू दिसतिये.. सतत लिहित बसली होती काहितरी'
'तोच तर problem आहे...'
'म्हणजे?'
'अरे इतकी सुंदर आणि हुषार मुलगी पण हे लेखनाचं खूळ कुठून तिच्या डोक्यात शिरलंय काही कळत नाही. सकाळ, दुपार, संध्याकाळ जेंव्हा बघावं तेंव्हा नुसती लिहित बसलेली असते... कथा, कविता, कादंबऱ्या, पटकथा, लेख, स्फुटं... तिला काही म्हणजे काही वर्ज नाही रे... '
'अहो चांगलंच आहे की मग... एक कलाकार तुमच्या घरात आहे आणि तुम्ही...'
'चांगलं? थांब तुला दाखवतोच मी आता...'
काकांनी ड्रॉवरमधुन एक आठ दहा फुलस्केप वह्या काढुन माझ्या समोर ठेवल्या
'इथे एवढ्याच आहेत, बाकिच्या सगळ्या माळ्यावर ठेवल्या आहेत. काय सांगू अरे, रद्दीवालाही घेत नाही या वह्या... Anyways तूच बघ आणि सांग...'
मी घाबरत घाबरत पहिली वही उघडली. पहिल्या पानावर मध्यभागी लिहिलं होतं 'चांदणे झाले फुलांचे' आणि खाली झोकदार सही होती 'चिन्मयी', आयला चिमेचं नावं चिन्मयी आहे तर! बरं! मी पहिलं पान उघडलं आणि ती दीर्घकथा वाचायला सुरुवात केली
'नागमोड्या वाटेच्या एका टोकावर रमा उभी होती, आपल्या वळणदार दु:खांच्या आवेगांना कुरवाळत... अस्तित्वाच्या उन सावल्या असतातच अशा गहि या... उजेडवेड्या पणत्यांच्या आठवणी रमानं आपल्या उराशी बाळगल्या असत्याही... पण का ही अशी..... '
बास... धाप लागली मला... आईशप्पत.. काय लिहिते ही बया... पण पटकन वही दूरही ढकलता येईना. मग उगाचच एक एक पान उलटत राहिलो पानापानावर मला पणत्या, तुळशी, दिवे, पक्षी, गजरे, मोगरे, नाती गोती, प्रेमालाप.. असं बरंच काही असंबद्ध दिसत होतं. मी उगाचचं 'हुं, अरे वा' असं काहीसं पुटपुटत पानं उलटत होतो... तशीच दुसरी वही, तशीच तिसरी.... मला चक्कर यायला लागली...
'सगळे उपाय करून झाले रे' देशपांडे काका...
'अं... '
'नाही म्हणलं सगळे उपाय करून झाले, प्रेमानी समजावून सांगितलं, रागवून बघितलं, धमक्या दिल्या, psychiatrist कडे नेलं सगळं सगळं झालं. पण ही मुलगी काही केल्या तिचं लिखाण थांबवत नाहिये. मी जर राजा असतो ना तर हिचं हे वेड बरं करणायाला मी अर्ध राज्य बक्षीस दिलं असतं. पण काय करणार, माझी ही अशी Dental Practice, दुस याचे दात कोरून आम्ही पोट भरणार... काय करावं काही कळत नाही... '
मला काकांची फारच दया आली. पण मी तरी काय करू शकणार होतो? दहावीपर्यंत जे कंपल्सरी शिकावंच लागलं होतं ते सोडलं तर माझा आणि मराठी वाड़्मयाचा काहीच संबंध नव्हता. आणि तेंव्हाचाही माझा मराठीचा अभ्यास एकवीस अपेक्षित पुरताच मर्यादित होता. असं असताना या चिन्मयी उर्फ चिमाच्या लेखनवेडाचं मी काय करू शकणार होतो?
'परवाच शहाणे वहिनी सांगत होत्या' काकू आता बोलायला लागल्या.
'शहाणे वहिनी म्हणजे चांगलच असेल काहीतरी' मी आपलं उगाचच काहीतरी...
'त्या सांगत होत्या स्वामी चंद्रकुमार जोशी म्हणून कोणीतरी आलेत म्हणे अमेरिकेहून आणि कशानीही झपाटलेल्या माणसाला एक दोन visits मधे खडखडीत बरं करतात म्हणे!'
बास... आता या पुढच्या प्रसंगाचं मी काही फार सविस्तर वर्णन करत नाही. काकूंनी मला जोशाबद्दल सांगणं. काकांनी सारखा सारखा अलोकनाथसारखा दयनीय चेहरा करणं, मग मला चिमाला तिकडे घेउन जायची गळ घालणं आणि मीही ती जबाबदारी माझ्या शिरावर घेणं हा घटनाक्रम तुम्ही ओळखला असेलच.
या सगळ्याचा परिणाम म्हणूनच मी आत्ता इथे उभा आहे, दक्षिणमुखी मारूतीच्या बोळात, स्वामी चंद्रकुमार जोशी यांच्या वाड्यात आणि माझ्या सोबत आहेत, मराठी वाङ्मयाच्या उदयोन्मुख तारका चिमा उर्फ चिन्मयी देशपांडे.
या जोशाच्या वाड्यात आलोय खरं, पण अजुनही मी या कॉम्प्युटराईज्ड जोशाबद्दल जरा साशंकच आहे. एक तर हा जोशी, त्यातून पुण्यातला आणि पुण्यात कॉम्प्युटरचा कोण कसा वापर करेल काही सांगता येत नाही. थोड्याच दिवसांपूर्वी मी एका ठिकाणी पाटी पाहिली होती 'येथे कॉम्प्युटरवर पत्रिका करून मिळतील' लग्नाळू असल्यामुळे मी आत गेलो आणि Computer वर पत्रिका करायची ऑर्डर दिली. मी पैसे भरल्यावर तिथल्या माणसानी Computer चा CPU आडवा पाडला आणि त्यावर एक कागद ठेवून हातानीच पत्रिका लिहून दिली! आणि याहून कमाल म्हणजे, या दुकानाच्या शेजारीच 'येथे कॉम्प्युटरवर चकल्या करून मिळतील अशी पाटी होती आणि तिथे एक बाई CPU वर पेपर टाकुन सोऱ्यानी चकल्या पाडताना दिसत होती! तर पुण्यामधे Computerised याचा अर्थ दुकानात कुठेतरी Computer आहे आणि त्याचा आम्ही कसातरी वापर करतो असा होतो!
पुणेकरांच्या Computerization बद्दल असा अनुभव जमेस असल्यामुळे हा Computerized पद्धतीने भुतं उतरवणारा जोशा नक्की कसा असेल याचं चित्र मी डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न करत होतो. राहुन राहुन मला असं वाटत होतं की लांब दाढी वाढवलेला, मांत्रिका सारखी कफनी घातलेला, गळ्यात CDs ची माळ आणि कपाळी जळक्या Floppies चं भस्म लावलेला कोणी बाबा असावा. पण मी प्रत्यक्षात त्याला पाहिलं तेंव्हा हे चित्र घुळीस मिळालं! स्वामी चंद्रकुमार असं भारदस्त नाव धारण केलेला हा माणूस बर्मुडा, टीशर्ट, उलटी टोपी, छानदार पोनीटेल आणि एका कानात डूल घातलेला typical US returned software professional दिसत होता!
तर अशा दिसणा या या मांत्रिकाच्या गुहेत, sorry जोशीबुवांच्या Advanced CyberNeurotic Research Lab मधे आम्ही शिरलो! जोशानी आमचं हसुन स्वागत केलं. मग त्याची Methodology, Professional Ethics, Consulting Fees असे सगळे तपशील American accent मधल्या मराठीत सांगितले! सगळं सांगून झाल्यावर NDAs, Legal Disclaimers अशा काय काय कागदांवर आमच्या सह्या घेऊन तो आम्हाला त्याच्या Lab मधे घेऊन गेला.
त्याच्या त्या Lab मधे अनेक वेगवेगळ्या प्रकारची यंत्र विखुरलेली होती. सगळीकडुन अनेकप्रकारचे दिवे लुकलुकताना दिसत होते. या सगळ्या यंत्रांना जोडणा या वायरींमधुन वाट काढत काढत आम्ही आत शिरलो.
तिथल्या एका विचित्रशा दिसणा या खुर्चीवर त्यानी चिमाला बसवलं. त्या खुर्चीतून बाहेर आलेल्या काही वायरींची टोकं तिच्या हातावर, कपाळावर अशी चिकटपट्टीनी लावली. हे सगळे सोपस्कार पार पाडून स्वामीजी त्यांच्या Computer वर जाउन बसले. त्यांनी चिमाला सांगितलं, 'डोळे मिटा आणि तुम्ही तुमचं आवडतं लिखाण करत आहात असं imagine करा' चिमानी डोळे मिटले आणि तो जोशा त्याच्या computer वर काय काय खुडबुड करायला लागला. तोंडानी काय काय पुटपुटणं, मधेच काही टाइप करणं, मधेच माउस हलवून क्लिकक्लिकाट करणं असं बरंच काही तो जोशा बराच वेळ करत होता. जस जसा वेळ जायला लागला तस तसा त्याच्या कपाळावर घाम जमायला लागला आणि चेहऱ्यावर टेंशन दिसायला लागलं. शेवटी दीड दोन तासाच्या अथक प्रयत्नांनंतर त्यानी चेहरा पाडून माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला,
'खूपच अवघड केस आहे हो, काय होतंय काही कळत नाहीये. Normally येवढ्या वेळात मी भल्या भल्या केसेस solve केल्या आहेत. पण या मॅडमच लेखनवेड फारच powerful दिसतंय. अहो, आता माझ्या computer लाही problem यायला लागलाय. मला code मधे changes करावे लागतील बहुदा. तुम्ही एक काम करा, आज यांना घेउन जा आणि परत एका आठवड्यानी या. तोवर मी जरा नविन code ही लिहीन आणि system ही upgrade करून घेइन'
मी हताश होऊन चिमाला घेउन तिथून बाहेर पडलो तिला तिच्या घरी नेऊन काका काकूंना सगळा वृत्तांत सांगितला. त्यांना पुढच्या appointment बद्दलही सांगितलं.
त्या पुढचे दोन तीन आठवडे मी खूपच कामात अडकलो म्हणून मी त्यांच्याकडेही जाउ शकलो नाही आणि चिमालाही जोशाकडे घेउन जाउ शकलो नाही. मला त्यांचा काही फोनही आला नाही आणि मलाही फोन करायला जमलं नाही. ते चिमाला घेउन जोशाकडे गेले का नाही काही कळायला मार्ग नव्हता. पण आता वाटतंय की ते नक्कीच गेले असावेत. त्याचं काय झालं की काल परवाच मी दक्षिणमुखी मारूतीच्या बोळातून चाललो होतो तेंव्हा सहज म्हणून जोशाच्या वाड्याकडे पाहिलं तर तिथे मला एक नवीन पाटी दिसली...
'आमचे येथे सर्व प्रकारच्या कथा, कादंबऱ्या, कविता इ. वाङमय प्रकार ठोक तसेच किरकोळ भावात कॉम्प्युटराइज्ड पद्धतीने तयार करून मिळतील भेटा: चंद्रकुमार जोशी व चिन्मयी देशपांडे'
- प्रसाद शिरगांवकर
या कथेची कथा!
ही कथा मायबोलीच्या २००३ च्या दिवाळी अंकामधे प्रसिध्द झाली होती. तिथून कोणा कॉपी-पेस्ट व्यावसायिकाने उचलून ईमेलद्वारे 'पुणेरी पुणेकर' या शीर्षकाखाली लोकांना पाठवली. आणि ती अजूनही भटकतेच आहे!
सुदैवाने त्या ईमेल मधे लेखकाचं नावही दिलं होतं! ते नाव वाचून आजवर अनेकांनी ही कथा मी लिहिली आहे का अशी विचारणा केली. मी लंडनला असताना मुंबईहून एका उत्साही व्यक्तीने तर माझा पत्ता शोधून, फोन करून ही विचारणा केली होती (आई शप्पत हे खरं आहे!) अर्थात त्या व्यक्तीला या कथेवर आधारित एकांकिका लिहिण्यासाठी परवानगी हवी होती. त्या व्यक्तीने पुढे अशी एकांकिका लिहून ती मुंबईमधे सादरही केली होती!