गझल

गझल

अक्षता

एवढी आहे सखे प्रेमार्तता माझी तुझी
आपल्या नात्यात होते पूर्तता माझी तुझी

थांबल्या आकाशगंगा थांबली तारांगणे
स्तब्ध सारे ही कहाणी ऐकता माझी तुझी

एकमेकांच्या सुरांचा स्वर्गही मागू अता
देत आहे मागतो ते देवता माझी तुझी

कालही का वादळे? ही आजही का वादळे?
वादळे येतात, स्वप्ने ऐकता माझी तुझी

लग्न हे होण्याचसाठी सज्ज या सार्‍या दिशा
या दिशा घेउन येती अक्षता माझी तुझी

Average: 6.5 (4 votes)

सोवळा

वेगळा आवाज माझा वेगळा माझा गळा
राहुनी गर्दीतही या राहतो मी वेगळा

बाटलेले सूर सारे आज माझ्या भोवती
त्या सुरांच्या मध्यभागी सूर माझा सोवळा

मी कधी मागीतली नाही तुझी तारांगणे
का तरीही भोगतो त्या तारकांच्या मी झळा

आजही तोडून गेले ते फुलांच्या पाकळ्या
आसवांनी सिंचतो मी आजही माझा मळा

राहिली माझी इथे ना राखही आता जरी
का पुन्हा दारात यावा हा भुकेला कावळा

Average: 7.6 (7 votes)

हृदयात या रुजले ऋतू

हृदयात या रुजले ऋतू
देहात या फुलले ऋतू

ही पालवी आली नवी
हे अंतरी सजले ऋतू

Average: 8.3 (43 votes)

नवे उठाव...

रोज वेगळेच नाव, रोज वेगळेच गाव
रोज वेगळे जमाव, रोज वेगळे तणाव

कालचा जुनाच माल, कालचाच हा दलाल
आज का नवीन भाव? आज का नवे लिलाव?

आरशात पाहतोय आज हे नवीन काय?
चेहरा असे जुनाच, हे नवीन हावभाव!

थांबलीय अंगणात ही नवीन चांदरात
मी अजून मांडतोय कालचे जुनेच डाव

घेतले लगाम मीच, जाहलो गुलाम मीच
बंड हे अता कशास? का अता नवे उठाव?

Average: 8 (5 votes)

राज्य मर्तिकांचे

मानवाने जीवघेणे युद्ध का खेळायचे?
माणसाने माणसाला का असे मारायचे?

आसमंती वर्षती ही आजही अस्त्रे पुन्हा
एकमेकाने दुजाचे देश का जाळायचे?

सावराया आज नाही कोणही कोणासवे
एकमेकां बांधणारे पाश का तोडायचे?

हीन हा नी हीन तो, ही हीनता आली कशी?
मानवाने मानवाला हीन का मानायचे?

संपला हा, पेटला तो, जिंकलो आम्ही अता
आकडे हे मर्तिकांचे का असे सांगायचे?

राहिली प्रेतेच सारी आज माझ्या अंगणी
राज्य सा या मर्तिकांचे काय मी भोगायचे?

Average: 7 (1 vote)

गंगा...

वीष मी मस्तीत प्यालो
पिउनी मी धुंद झालो

चालण्याला वाळवंटी
घेउनी तारे निघालो

ना कळे माझे मलाही
मी कसा पाउस झालो

का मलाही आठवेना
काय मी मागे म्हणालो

का असे मी केवड्याचे
वाळलेले पान ल्यालो

भावना ओल्याच होत्या
कोरडे मी शब्द प्यालो

आसवांची रोज गंगा
आसवांनी रोज न्हालो

No votes yet

भास्कर तो गझलेचा...

तेजाने तळपत होता भास्कर तो गझलेचा
शून्यात लोपला आता भास्कर तो गझलेचा

हातात घेतली होती त्याने मशाल चैतन्याची
आजन्म पेटला होता भास्कर तो गझलेचा

Average: 9.7 (18 votes)

श्वासही आहे इथे...

कालही होतो इथे मी आजही आहे इथे
ध्येयही येथेच आहे वाटही आहे इथे

का धरू मी पालवीची आस माझ्या अंतरी
कालचे ते वाळलेले पानही आहे इथे

थोडक्या या चांदण्याने ये अता झिंगू जरा
चांदणी आहे इथे नी चंद्रही आहे इथे

बोलली मी अक्षरे ती धूळ सारी जाहली
लोपल्या धूळाक्षरांची धूळही आहे इथे

काय देवू मी पुरावा लाडके आता तुला
प्रेमरंगी रंगलेला श्वासही आहे इथे

No votes yet

स्वप्नांधता...

ना तुला भेटूनही ही ओढ वाटावीच का?
अंतरी माझ्या तुझ्या ही ज्योत पेटावीच का?

सूर जे नाही मिळाले शोधुनी दाही दिशा
खिन्न माझ्या अंतरीची धून तू गावीच का?

जीव सांभाळून आहे कोणत्या आशेवरी?
वाळवंटी ही सुखांची आस स्पंदावीच का?

बोललो मी एवढा की शब्द सारे संपले
मी तरी बोलायचे ते बोललो नाहीच का!

स्वप्न जे जे पाहिले ते जाळुनी गेले तरी
आजही स्वप्नांधतेचे पारडे भारीच का?

Average: 5.5 (2 votes)

घोळक्याने...

येतात घोळक्याने, जातात घोळक्याने
आयुष्य का असे हे जगतात घोळक्याने

कोणीच येत नाही जीवास वाचवाया
प्रेतास जाळण्याला जमतात घोळक्याने

Average: 7.8 (8 votes)