मांडलिक
होतो कधीतरी मी सम्राट अंबरीचा
मी मांडलीक आता चतकोर भाकरीचा
जे साठवून झाले, निसटून जात गेले
आला मला कधी ना अंदाज पायरीचा
गर्दीत भोवताली हे गारदीच सारे
अन शोधतो फुकाचा मी सूर बासरीचा
हे रक्त आटलेले, ते रक्त बाटलेले
रक्तास रंग नाही कोठेच खातरीचा
दाही दिशांस गेलो शोधात मी सुखाच्या
ना पाहिला कधीही मी सूर्य अंतरीचा