तुला सांगतो भगवंता...
तुला सांगतो भगवंता हे असे वागणे असू नये
तुला चेहरा माझा दिसतो, मला तुझा का दिसू नये!
वस्त्र नागडे तेजाचे घे, वा दुलई अंधाराची
तेज-तमाच्या सीमेवरती जिवास उसवत बसू नये!
वैयक्तिक
तुला सांगतो भगवंता हे असे वागणे असू नये
तुला चेहरा माझा दिसतो, मला तुझा का दिसू नये!
वस्त्र नागडे तेजाचे घे, वा दुलई अंधाराची
तेज-तमाच्या सीमेवरती जिवास उसवत बसू नये!
आपल्या दोघांमधे ही गॅप का?
ऐकतो मी लावण्या, तू रॅप का?
राहतो राणी तुझ्या हृदयात मी
शोधते आहेस गूगल-मॅप का!
भासतो त्यांना सुखाचा दास मी
वेदनांची मांडतो आरास मी!
पाहतो ते ते खरे मी मानतो
केवढे जपतो उराशी भास मी...
काय वाटते मला कशास कोण ऐकतो?
आजकाल मी मनातल्या मनात बोलतो!
रंग वेदनांस देत राहतो नवे नवे
शेवटी मनात मी सुखेच सर्व रेखतो
ती जाताना 'येते' म्हणून गेली
अन जगण्याचे कारण बनून गेली!
म्हटली मजला 'मनात काही नाही'
पण जाताना मागे बघून गेली!
प्राण ओसरायचाच आज ना उद्या
देह हा जळायचाच आज ना उद्या
वात थोडकी तसेच तेल थोडके
दीप मंद व्हायचाच आज ना उद्या
घे गड्या, फुलून घे, वसंत दाटला...
हा ऋतू सरायचाच आज ना उद्या
आवरावया हवीस प्यास चातका
मेघ ओसरायचाच आज ना उद्या
मोजलेस तू मनात आकडे किती
अर्थ शून्य व्हायचाच आज ना उद्या
घट्ट सोबती असो तुझा कुणी किती
हात तो सुटायचाच आज ना उद्या
भासते तुझेच गीत गुंजते नभी
सूर हा विरायचाच आज ना उद्या
अक्षरांना आस गीतांची
पावलांना ओढ पंखांची!
पाणपोया निर्मितो आम्ही
रीघ दारी तान्हलेल्यांची
माझ्या आठवणींनी तुझं हृदय
व्हायब्रेट होत राहू दे
तुझ्या हृदयात माझ्या प्रेमाचा
रिंगटोन वाजत राहू दे!
मी आठवणींना टाळत बसलो आहे
अन स्वप्न उरीचे जाळत बसलो आहे
गातेस कसे हे सूर असे भरकटले
मी ताल तुझे सांभाळत बसलो आहे
किती आवडावे मला तू... तुला मी...
तरी का छळावे मला तू... तुला मी...
जसा चातका आठवे पावसाळा
तसे आठवावे मला तू... तुला मी...