प्रत्येक देशाचं सरकार आपापल्या देशाच्या चलनी नोटा छापतं. ते ते चलन त्या त्या देशात लीगल टेंडर असतं आणि साधे कागदी तुकडे असूनही ते देशातल्या सर्व व्यवहारांसाठी ते वापरले जातात.
बिटकॉईन्स हे मात्र कोणी एक सरकार, कंपनी, संस्था किंवा व्यक्ती तयार करत नाही. ते चलन कोणाच्याच मालकीचं नाही. कोणा एकाचं त्यावर नियंत्रण नाही. ते चलन वापरणाऱ्या सर्व 'नेटवर्क'च्या मालकीचं आहे.
बिटकॉईन हे मुक्तस्रोत (ओपन सोर्स) सॉफ्टवेअर मधून तयार होणारं आणि वापरता येऊ शकणारं चलन आहे. बिटकॉईन संबंधित सॉफ्टवेअर्स वापरून 'नेटवर्क'साठी ठराविक काम करणाऱ्या लोकांना नवी बिटकॉईन्स मिळतात.
ह्या कामाचं मुख्य स्वरुप काही अत्यंत क्लिष्ट गणिताचे प्रश्न सोडवणं असं असतं. (गणितं वगैरे सोडवून करन्सी मिळेल असं लहानपणी कोणी सांगितलं असतं तर निदान पाढे तरी पाठ केले असते! पण ते असो). अर्थात ती अत्यंत क्लिष्ट गणितं सोडवायाचा प्रयत्न करणारीही सॉफ्टवेअर्स असतात आणि ती आपल्याला आपल्या कंप्युटरवर चालवत ठेवायची असतात. ह्याला बिटकॉईनचं खाणकाम उर्फ 'मायनिंग' म्हणतात. हे मायनिंग करत करत काही ठराविक गणिती कोडं सोडवलं की ते सोडवणाऱ्याला ठराविक बिटकॉईन्स मिळतात.
ही गणिती कोडी सहज गंमत म्हणून घातलेली कोडी नसून ती कोडी सोडवल्यानं बिटकॉईनचे व्यवहार अधिकाधित सुरक्षित होत असतात. आणि गंमत म्हणजे आधीची कोडी सुटली की येणारी नवी कोडी जास्त जास्त क्लिष्ट बनत जातात.
पण अशी अनंत कोडी सोडवत राहून अमर्याद बिटकॉईन्स तयार होणार नाहीत, कारण जगात एकुण किती बिटकॉईन्स तयार होणार यावर मर्यादा आहे, तसंच दर महिन्या-वर्षाला किती नवी बिटकॉईन्स तयार होणार यावरही मर्यादा आहे. दोन्ही मर्यादा त्याची सुरुवात ज्यांनी केली त्या डेव्हलपर्सनी आखून देऊन सॉफ्टवेअरमध्येच अंतर्भूत केल्या आहेत. जगातल्या सर्व डेव्हलपर्सनी आणि सर्व नेटवर्कनी मान्य केल्याशिवाय ह्यात बदल होणार नाही.
तर अशा पद्धतीने तयार झालेल्या बिटकॉईन्सचं लोक करतात काय?
एखाद्याकडे मायनिंग करून बिटकॉईन्स जमली की ती तो ऑनलाईन गोष्टी विकत घेण्यासाठी वापरू शकतो. किंवा जगातल्या दुसऱ्या कोणालाही पैसे म्हणून बिटकॉईन्स पाठवू शकतो.
तसंच अनेक बिटकॉईन एक्सचेंजेसही सुरु झाली आहेत. जवळचे बिटकॉईन्स विकून साधा सरकारी पैसा घ्यायचा असेल किंवा सरकारी पैसा देऊन बिटकॉईन्स विकत घ्यायची असतील तर ते ह्या एक्सचेंजेसवर जाऊन करता येतं.