बिटकॉईन्स आणि एकूणच सर्व गूढचलनं यांच्या नियंत्रणासाठी भारत, अमेरिकेसह जगातल्या बहुसंख्य देशांमध्ये कायदेच नाहीत. किंबहुना, जगातल्या कोणत्याही देशाच्या नियंत्रणामध्ये न रहाता जगातल्या ज्याला वापरावंसं वाटतंय त्या कोणाच्याही मालकीचं 'मुक्त' चलन असावं या हेतूनचं गूढचलनांची निर्मिती झाली होती.
बिटकॉईन्सचं मायनिंग करणं, ती जवळ बाळगणं, ती वापरून व्यवहार करणं हे काहीही म्हणजे काहीही, जगातल्या बहुसंख्य देशांमध्ये बेकायदेशीर नाही, भारतातही नाही.
मात्र सध्याच्या कायद्यांनुसार जे बेकायदेशीर आहेत असे व्यवहार बिटकॉइन्स वापरून करणं हे निश्चितच बेकायदेशीर आणि दंडनीयही आहे. उदा. सध्याच्या कायद्यांनुसार हवाला किंवा money laundering करणे, दहशतवादी किंवा देशद्रोही कारवायांसाठी फंड्स पुरवणे, ड्रग्ज विकणे/विकत घेणे हे अत्यंत गंभीर गुन्हे आहेत. हे करण्यासाठी बिटकॉईन्स वापरली तरी ते गुन्हेच समजले जातात आणि वापरणाऱ्यावर कठोर कारवाई होऊ शकते.
तसंच भारतात परकीय चलन व्यवस्थापनासाठी FEMA नावाचा कायदा आहे. ह्या कायद्यानुसार कोणतीही व्यक्ती किती पैसे (मुख्यतः परकीय चलन, डॉलर्स) देशाबाहेर खर्च किंवा गुंतवणुकीसाठी पाठवू शकते यावर बंधन आहे (सध्या ते बंधन 25000 डॉलर्स प्रती वर्ष असं आहे). याहून जास्त पैसे जर बिटकॉईन्स विकत घेण्यासाठी तुम्ही देशाबाहेर पाठवले तर चौकशी होऊन तुम्ही 'फेमा'च्या फेऱ्यात अडकू शकता.
भारतात सध्या बिटकॉइन्स हे कोणीही व्यापारी, दुकानदार स्वीकारत नाहीत. म्हणजे भारतात बिटकॉईन्स वापरून काहीही 'व्यवहार' करणं शक्य नाही. सध्या जे लोकं बिटकॉईन्स विकत घेत आहेत ते केवळ गुंतवणुक किंवा सट्टेबाजीसाठी विकत घेत आहेत. बिटकॉईन्सचे भाव सटासट वाढत आहेत बघून त्यात ट्रेडींग करून झटपट पैसे कमवावेत या हेतूनं बिटकॉईन्स घेत आहेत. गुंतवणुक, सट्टेबाजी किंवा 'झटपट श्रीमंत होणं' हे काही बेकायदेशीर नाही. मात्र बिटकॉईन्स घेऊन आणि विकून झालेला नफा 'इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये' न दाखवणं आणि त्यावर टॅक्स न भरणं मात्र बेकायदेशीर आणि दंडनीय आहे.
थोडक्यात बिटकॉईन्स विकत घेणं, विकणं किंवा जवळ बाळगणं बेकायदेशीर नाही. बिटकॉईन्स वापरून ऑनलाईन व्यवहार करणंही बेकायदेशीर नाही. मात्र कोणत्याही मुळात बेकायदेशीर असलेल्या व्यवहारासाठी बिटकॉईन्स वापरणं किंवा बिटकॉईन्सच्या सट्टेबाजी किंवा गुंतवणुकीतून झालेल्या नफ्यावर टॅक्स न भरणं हे मात्र बेकायदेशीरच आहे आणि हे केलंत तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते!!