बिटकॉईन नावाचं 'गूढचलन'

प्रसाद शिरगांवकर
bitcoin

चलन म्हणजे काय?

आपण किराणामालाच्या दुकानात जातो. आपल्याला हव्या त्या वस्तू विकत घेतो. त्या वस्तूंच्या बदल्यात, वस्तूंच्या किमती इतकी किंमत छापलेले कागदाचे तुकडे त्याला देतो. हे कागदाचे तुकडे म्हणजे आपल्या देशात चलनात असलेल्या नोटा.

कागदाला स्वतःचं असं काहीच मूल्य नसतं. पण चलनी नोटांवरच्या सरकारच्या (RBI गव्हर्नरच्या) सहीमुळे त्यांच्यात मूल्याची ‘प्राणप्रतिष्ठा' होते. त्या कागदांना सरकारनं पाठबळ दिलं असतं म्हणून क्षुल्लक कागदाच्या तुकड्यांना शे-पाश्शे-हजार ‘रुपये’ इतकं ‘मूल्य' मिळतं.

डिजिटल युगात तर ह्या नोटांचंही महत्व कमी होत चाललं आहे, होणार आहे. किराणामालाच्या दुकानातून वस्तू विकत घेतल्यावर तिथे डेबिट / क्रेडिट कार्ड स्वाईप करता येतं. वस्तू आपण घरी घेऊन येतो आणि ‘पैसा’ हा आपल्या व्हर्चुअल बँक अकाउंट मधून दुकानदाराच्या व्हर्चुअल बँक अकाउंटमध्ये जातो. प्रत्यक्ष चलन हस्तांतरित न होताही हा व्यवहार होतो. कारण डिजिटल चलन आणि बँक व्यवस्थेवर आपला विश्वास असतो आणि त्यांना सरकारी पाठबळ असतं.

चलनाची अगदी सोपी व्याख्या करायची तर दोन अनोळखी व्यक्तींमधला व्यवहार होण्यासाठी वापरली जाणारी, दोघांचाही ज्यावर विश्वास आहे अशी एखादी, स्वतःला काही आंतरिक मूल्य नसलेली, गोष्ट म्हणजे चलन.

गेली काही हजार वर्षं, जगभरात सर्वत्र, व्यवहारासाठी उपयुक्त अशी चलनं, आधी राजे-रजवाडे आणि नंतर सार्वभौम देशांची सरकारंच व्यवहारात आणत आली आहेत. सध्याही प्रत्येक देशाला स्वतःचं चलन असतं आणि त्यावर त्या त्या देशाच्या सरकारचं पूर्ण नियंत्रण असतं.

ह्या संपूर्ण संकल्पनेला छेद देणारी नवी ‘गूढचलनं’ जगात आली आहेत. ही कोणत्या एका देशाच्या सरकारनं तयार केलेली चलनं नसून ती अत्यंत क्लिष्ट सॉफ्टवेअरनं तयार केलेली चलनं आहेत. त्यावर कोणा एकाची मालकी नसून ती चलनं ती वापरणाऱ्या सगळ्यांच्या मालकीची आहेत. आणि त्यांचा वापर आणि दर हा कोणी एक सरकार ठरवत नसून एकूण सर्व वापरकर्त्यांच्या विश्वास, मागणी आणि पुरवठ्यावर आपोआप ठरला जात आहे.

व्यवहार, चलन आणि पैशाचं हे, कदाचित, भविष्य आहे.

ही नक्की काय भानगड आहे, ती अस्तित्वात कशी आली, सध्या काय परिस्थिती आहे आणि भविष्यात काय घडू शकेल याचा वेध घ्यायचा प्रयत्न या लेखमालेमध्ये केला आहे.

Average: 7.8 (5 votes)