अगदी ताजं लिखाण

रक्तात साकळूया

आता असे जळूया
विश्वात दर्वळूया

पेटून आज दोघे
प्रेमात पाघळूया

मला न आले...

त्यांच्या ऋतुंप्रमाणे जगणे मला न आले
ते सांगतील तेंव्हा फुलणे मला न आले

हा चेहराच माझा या आरशात आहे
भलत्याच चेहर्‍यांना बघणे मला न आले

निखारे थांबले होते...

भोवताली गाव सारे थांबले होते
दूर माझे खिन्न वारे थांबले होते

वादळे झेलून गेलो मी कुण्या देशी
माझियासाठी किनारे थांबले होते

वेळच्यावेळी

पाहिजे ते सर्व केले वेळच्यावेळी
ना मला काही मिळाले वेळच्यावेळी

देत आहे मी तुला ही राखरांगोळी
मी जळोनी राख झाले वेळच्यावेळी

उधाण

बेभान नाचणारे बेहोष घुंगरू मी
बेताल पावसाची का आर्जवे करू मी?
माझ्याच बासरीचे रानात सूर सार्‍या
सांगा कुणाकुणाचे वनवास मंतरू मी?

पदरात चांदणे घे

माझे जरा तरी तू ऐकून बोलणे घे
विझवून हे निखारे पदरात चांदणे घे

सारेच फेकुनी दे काटे उरातले तू
श्वासांत मोगर्‍याचे निष्पाप गंधणे घे

अक्षता

एवढी आहे सखे प्रेमार्तता माझी तुझी
आपल्या नात्यात होते पूर्तता माझी तुझी

थांबल्या आकाशगंगा थांबली तारांगणे
स्तब्ध सारे ही कहाणी ऐकता माझी तुझी

सोवळा

वेगळा आवाज माझा वेगळा माझा गळा
राहुनी गर्दीतही या राहतो मी वेगळा

बाटलेले सूर सारे आज माझ्या भोवती
त्या सुरांच्या मध्यभागी सूर माझा सोवळा

हृदयात या रुजले ऋतू

हृदयात या रुजले ऋतू
देहात या फुलले ऋतू

ही पालवी आली नवी
हे अंतरी सजले ऋतू

नवे उठाव...

रोज वेगळेच नाव, रोज वेगळेच गाव
रोज वेगळे जमाव, रोज वेगळे तणाव

कालचा जुनाच माल, कालचाच हा दलाल
आज का नवीन भाव? आज का नवे लिलाव?

राज्य मर्तिकांचे

मानवाने जीवघेणे युद्ध का खेळायचे?
माणसाने माणसाला का असे मारायचे?

आसमंती वर्षती ही आजही अस्त्रे पुन्हा
एकमेकाने दुजाचे देश का जाळायचे?

गंगा...

वीष मी मस्तीत प्यालो
पिउनी मी धुंद झालो

चालण्याला वाळवंटी
घेउनी तारे निघालो

भास्कर तो गझलेचा...

तेजाने तळपत होता भास्कर तो गझलेचा
शून्यात लोपला आता भास्कर तो गझलेचा

हातात घेतली होती त्याने मशाल चैतन्याची
आजन्म पेटला होता भास्कर तो गझलेचा

श्वासही आहे इथे...

कालही होतो इथे मी आजही आहे इथे
ध्येयही येथेच आहे वाटही आहे इथे

का धरू मी पालवीची आस माझ्या अंतरी
कालचे ते वाळलेले पानही आहे इथे

स्वप्नांधता...

ना तुला भेटूनही ही ओढ वाटावीच का?
अंतरी माझ्या तुझ्या ही ज्योत पेटावीच का?

सूर जे नाही मिळाले शोधुनी दाही दिशा
खिन्न माझ्या अंतरीची धून तू गावीच का?

घोळक्याने...

येतात घोळक्याने, जातात घोळक्याने
आयुष्य का असे हे जगतात घोळक्याने

कोणीच येत नाही जीवास वाचवाया
प्रेतास जाळण्याला जमतात घोळक्याने

तारकांपल्याड आहे जायचे...

तारकांपल्याड आहे जायचे
चांदण्यांचे गीत आता गायचे

कालचे गेले उन्हाळे संपुनी
पावसाने धुंद आता व्हायचे

मल्हार

हे एकटेपणाचे जगणे उदासवाणे
मल्हार आसवांचा ओल्या सुरात गाणे

कोणीच आज नाही या मैफलीत माझ्या
आहेत सोबतीला माझे सुने तराणे

आले किती गेले किती

नाही कधीही पाहिले, आले किती गेले किती
हे काय हाती राहिले, आले किती गेले किती

आहे कधीचा थांबलो राणी तुझ्या साठीतरी
मी श्वास नाही मोजले, आले किती गेले किती

हृदयात या रुजले ऋतू - गझल संगह 2

हृदयात या स्र्जले ऋतू हा माझा दुसरा ऑनलाईन गझल संग्रह. यात 2003 - 04 मधे लिहिलेल्या आणि प्रामुख्याने मायबोली.कॉम वर प्रकाशित झालेल्या गझला संकलित केल्या आहेत.

अंतरा

स्पंदनांचा आज माझ्या आसरा हो
तू सखे बागेत माझ्या मोगरा हो
शोधतो मी माझिया रूपास राणी
दर्पणी जो पाहतो तो चेहरा हो

मीरा

माझिया आतली मीरा बेभान नाचते आहे
तुझियात कृष्ण किनारा माझाच शोधते आहे

लाडक्या तुझ्या प्रेमाने अस्तित्व व्यापले माझे
प्रत्येक श्वास घेताना घुंगरू वाजते आहे

चंद्रास मावळू दे...

माझ्या तुझ्या सुरांच नातं असं जुळू दे
नात्यात आपल्या गं मल्हार कोसळू दे

आलीस घेउनी तू तारांगणे सुखाची
जातेस का? जरा या चंद्रास मावळू दे

पालखी

पेलता आली मला ना स्पंदनांची पालखी
घेतली गालावरी मी आसवांची पालखी

जाणले ना मी कधीही जायचे आहे कुठे
चालली आहे कुठे ही तारकांची पालखी

भाल

अक्षरांच्या घोळक्याला चाल का लाभू नये?
हाय माझ्या जीवनाला ताल का लाभू नये?

वार यांचे वार त्यांचे झेलतो छातीवरी
वार रोखायास साधी ढाल का लाभू नये?

पाने