मुग्ध बोली

प्रसाद शिरगांवकर

जायचे आहे कुठे ते स्पष्ट कोठे?
थांबलो आहे इथे ते इष्ट कोठे?

दूर मी लोटू कशी संदिग्धता ही
जन्मत: माझीच जी ती दुष्ट कोठे

जायचे नाही मला मी जात नाही
थांबण्यासाठी कशाचे कष्ट कोठे!

निर्णयाला वेळ थोडा लावणारी
मंद बुद्धी ही जरा, ही भ्रष्ट कोठे?

जाणतो आता जरा या जाणीवांना
अंतरीची मुग्ध बोली क्लिष्ट कोठे?

Average: 4 (1 vote)