तूच गा रे...।

प्रसाद शिरगांवकर

भेटण्याला वाकले आभाळ सारे
सांग तू आतातरी येशील का रे?

धावुनी मागे तुझ्या वेड्याप्रमाणे
श्रांत आता जाहले बेभान वारे

सोडुनी ये तू तुझ्या आकाशगंगा
चांदणे गावातले या गंधणारे!

दाटला चोहीकडे अंधार तेंव्हा
तेवणारा तूच तू होतास ना रे?

धृपदे श्वासांत माझ्या ओवताना
अंतरेही जीवनाचे तूच गा रे!

Average: 8.3 (3 votes)