मल्हार

हे एकटेपणाचे जगणे उदासवाणे
मल्हार आसवांचा ओल्या सुरात गाणे

कोणीच आज नाही या मैफलीत माझ्या
आहेत सोबतीला माझे सुने तराणे

दाटून आसमंती माझाच मेघ येतो
माझ्याच पावसाने माझेच मी नहाणे

होता वसंत तेंव्हा पाने गळून गेली
ग्रीष्मात हाय आता हे मोहरून जाणे

का एकटेपणाची आराधना करू मी
सोडेल साथ हा ही राणी तुझ्याप्रमाणे

Average: 8.6 (19 votes)