आले किती गेले किती

नाही कधीही पाहिले, आले किती गेले किती
हे काय हाती राहिले, आले किती गेले किती

आहे कधीचा थांबलो राणी तुझ्या साठीतरी
मी श्वास नाही मोजले, आले किती गेले किती

एकाच या चित्रास मी आहे कधीचा रेखतो
हे रेखण्याला कुंचले, आले किती गेले किती

नाही कसा आला इथे कोणी वसंता सारखा
सार्‍या ऋतुंचे काफिले, आले किती गेले किती

भेटून सार्‍या माणसांना हेच आहे जाणले
कोणीच नाही आपले, आले किती गेले किती

Average: 8.7 (7 votes)