ओंडक्यावरलं फुलपाखरू

उंच उंच वृक्षांनी भरलेल्या विस्तीर्ण जंगलात
मधेच कुठेतरी
निवांत पहुडलेला भला मोठा अोंडका
जगण्याचा भार असह्य होऊन
उन्मळून पडलेल्या एखाद्या महाकाय वृक्षाचा
कदाचित शंभरेक वर्षांचा

शंभर वर्ष जगताना त्यानं कमावलेल्या
फांद्या, पानं, मुळं…. कशाचाच पत्ता नव्हता
तोडून नेले असतील कोणी
किंवा मिसळून गेले असतील मातीत

शंभर पावसाळ्यांमधे
लाखो पक्षांनी घरटी बांधून
संसार थाटले असतील याच्या अंगाखांद्यावर
शेकडो प्रकारचे कीटक वावरले असतील
याच्या पाना-फांद्यांवर, हेच संपूर्ण विश्व आहे असं मानून

या साऱ्यापासून अनभिज्ञ
जीवनाकडे पाठ फिरवून
जमिनीवर निवांत पहुडलेला हा अोंडका
शंभर वर्षांचं कृतार्थ आयुष्य जगलेला

त्या अोंडक्यावर
सहजच एक फुलपाखरू येउन बसलं
चिमुकलं, रंगीत पंखांचं
छोटंसंच फुलपाखरू
आठ-दहा दिवसांचंच आयुष्य असलेलं
भूतकाळाचे पाश नसलेलं
भविष्याची आस नसलेलं

उन्मळून पडलेला शंभरीतला वृक्ष
आणि त्यावरचं चिमुकलं रंगीत फुलपाखरू
दोघांच्याही हातात नाही
‘किती’ जगावं….
पण दोघंही सांगत होते
‘कसं’ जगावं…!

अद्याप एकही मत नाही