बिटकॉईन्स: सट्टेबाजी आणि फसवणुक

प्रसाद शिरगांवकर

बिटकॉईन्सना सुरुवात झाली तेंव्हा त्यांचं मूल्य, अर्थातच, शून्य डॉलर होतं. जस जसं नेटवर्क वाढत गेलं, लोक बिटकॉईन्स तयार करायला लागले, ते वापरून व्यवहार करायला लागले तसं त्यांत ‘मूल्य’ तयार व्हायला लागलं. २०११ मध्ये एका बिटकॉईनचं मूल्य साधारण ३० सेंट्स (0.3 एवढं होतं). ते वर्षाभरात २ डॉलर्सपर्यंत वाढलं. पुढच्या वर्षात वाढत वाढत जाऊन ते २६६ डॉलर्स झालं आणि त्याच वर्षात कोसळून पुन्हा ५० डॉलर्सवर गेलं. पुढच्या दोन तीन वर्षां अफाट चढउतार होत राहिले. अगदी बाराशे-चौदाशे डॉलर्सपर्यंत मूल्य जायचं आणि कोसळून पाच-सहाशेवर खाली यायचं. मग दोन वर्षं सतत वाढतच राहिलं, अफाट वेगानं वाढत राहिलं आणि २०१७ मध्ये तर ते कैच्याकै वेगानं वाढतंय. 

आजमितीला एका बिटकॉईनचं मूल्य तब्बल १६६०० डॉलर्स आहे!! 

सहा वर्षाममध्ये मूल्यात सोळाहजारपट वाढ झालेली ही इतिहासातली एकमेव गोष्ट असावी. ह्यामुळे बिटकॉईन्स आणि एकुणातच बाकीचीही गूढचलनं हे सट्टेबाजांचं नंदनवन बनलं आहे सध्या. जवळचे खरे पैसे टाकून एक्सचेंजवरून बिटकॉईन्स विकत घ्यायची आणि दोन-चार महिन्यांत भाव वाढला की परत एक्सचेंजवर विकून टाकून नफा कमावयचा असा प्रकार सुरु आहे. ह्यात बहुदा जगभरातले मोठे सट्टेबाज सटोडिये उतरले असण्याची शक्यता आहे त्यामुळे मागणी वाढत आहे, मागणी वाढल्याने भाव वाढत आहेत आणि म्हणून अजून जास्त सट्टेबाज ह्यात उतरत आहेत. हे असं दुष्टचक्र झालं असल्याची दाट शक्यता आहे. 

ह्या शिवाय बिटकॉईनच्या किमतीतल्या दैदिप्यमान प्रगतीची आणि त्यात पैसे टाकून श्रीमंत झालेल्या लोकांची उदाहरणं सांगून यात आपल्याला पैसे टाकायला उद्युक्त करणारी. आणि मग शिस्तीत टोप्या घालणारी माणसं आणि कंपन्याही उगवल्या आहेत. ‘काही न करता झटपट श्रीमंत व्हा’ हे विकायला सगळ्यांत सोपं असलेलं स्वप्न आणि ‘आज घेतली नाही तर ही सगळ्यांत मोठी संधी आयुष्यात पुन्हा कधीच येणार नाही. You will miss the bus forever’ ही कोणालाही घाबरावयाला सगळ्यांत सोपी युक्ती ह्या दोन्हीच्या आधारानं आपल्या खिशातून खरे पैसे काढून घ्यायला काही हुषार ठग टपलेले असतात. गूढचलनं आणि त्यांच्या मूल्यात होणारी वाढ ही ह्या ठगांना मिळालेली आयती संधी आहे आणि त्याचा ते पुरेपुर वापर करत आहेत. 

गूढचलनांचा आपण जेंव्हा विचार करतो तेंव्हा उपयुक्तता, व्यवहार्यता, स्वातंत्र्य आणि आंतरिक मूल्याचा विचार करावाच पण त्याच बरोबर त्यातल्या सट्टेबाजांचा आणि ठगबाजीचाही विचार करावा. 

आपण जुगार खेळून, सट्टा लावून झटपट श्रीमंत होण्यासाठी गूढचलन विकत घेतो आहोत का हे आपलं आपण तपासावं. हे करायलाही हरकत नाही. पण मग ते आपल्या आयुष्यातल्या सर्वसमावेशक आणि विचार करून केलेल्या बचत आणि गुंतवणुकीच्या योजनेनुसार असलं पाहिजे. म्हणजे साधी बचत, फिक्स्ड डिपॉझिट्स, प्रॉव्हिडंट फंड, लाईफ इन्शुरन्स, मुच्युअल फंड्स, जमीन, सोनं आणि शेअर्स हे सारे पारंपारिक गुंतवणुकीचे मार्ग वापरून झाल्यावर उरलेले फंड्सच ह्या अत्यंत जोखमीच्या गूढचलनांमध्ये सट्टेबाजीसाठी वापरावे. जे वापरायचे ते पूर्ण अभ्यास करून वापरावे आणि असलेल्या कायद्याच्या चौकटींमध्ये राहून वापरावे. 

तसंच ह्या क्षेत्रात येताना आपण आपल्या खिशातले घाम गाळून कमावलेले खरे पैसे देऊन कुठलंसं आभासी गूढचलन विकत घेणार आहोत हे लक्षात ठेवावं. हे विकत घ्यायला कोणी आपल्याला उद्युक्त करत असेल, आमिषं दाखवत असेल तर सावध व्हावं. आमिषं दाखवणाऱ्या माणसांना खिशातले खरे पैसे कधीच काढून देऊ नयेत. सोन्याची कातडी दाखवणारी हरणं ही मायावी मारीच असतात हे सतत लक्षात ठेवावं! 

Average: 8 (1 vote)