वादळाचे गीत आता आणुया ओठांवरी

प्रसाद शिरगांवकर

वादळाचे गीत आता आणुया ओठांवरी
जीवनाचे वार सारे झेलुया छातीवरी ॥धृ॥

सागराला बांध घालू दोस्तहो आता
अंबराला साद देऊ दोस्तहो आता
तोलुया हे विश्व सारे आपल्या हातांवरी ॥१॥

पेटलो आम्ही तरीही राख ना होऊ
पेटत्या आगीमधूनी उंच झेपावू
ठेवुया विश्वास आता आपल्या पंखांवरी ॥२॥

भोवती अंधार आहे, खिन्नशा वाटा
आसमंती मुक्त आहे मेघ वांझोटा
चालुया ठेवून श्रध्दा आपल्या स्पंदांवरी ॥३॥

आमचे सुख-दुःख आहे आमच्या हाती
निर्मितो हे स्वर्ग आम्ही आमच्यासाठी
आमची आहेच निष्ठा आमच्या जगण्यावरी ॥४॥

Average: 7 (9 votes)