प्रसाद शिरगांवकर

असे जहालसे जहर तुझी नजर
मनात निर्मिते कहर तुझी नजर!

कितीक टाळलेस शब्द तू तरी
हळूच देतसे खबर तुझी नजर

मिठीतुनी हवे तसे दिलेच ना?
अजून मागतेय कर तुझी नजर!

दिसायची तिच्यातली अथांगता
करायची मनात घर तुझी नजर...

सखे तुझ्या मिठीमध्ये अनंतता
कशास पाहते प्रहर तुझी नजर?

खुशाल जा तुला जिथे हवे तिथे
मला पुरेल जन्मभर तुझी नजर

दिसायचे कसे मिटून पापण्या?
करायची कुठे सफर तुझी नजर?

फिरायचो जरी भणंग एकटा
दिसायचीच रानभर तुझी नजर

अजूनही तुझ्या मनी उन्हे कशी?
अजून शिंपतेच सर तुझी नजर

जगात पाहतो तिथे मला दिसे
जिथे तिथे तुझी नजर... तुझी नजर...!

Average: 6.5 (96 votes)