शब्द माझे मैफलीसाठी

प्रसाद शिरगांवकर

ओठ जैसे बासरीसाठी
शब्द माझे मैफलीसाठी

स्पंदनांच्या रोजच्या वार्‍या
ज्ञानियाच्या पालखीसाठी

पावसा, नाही तुझ्यासाठी
झाड प्यासे पालवीसाठी

निर्मिताना वाटले नाही
'ग्रंथ माझे वाळवीसाठी'!

कर्ज आता वाटतो राजा
विठ्ठलाला पंढरीसाठी!

जे कुणा बोलायचे बोला
जीव माझा शायरीसाठी

बांधताना एक ते होते
(वाद आता मालकीसाठी!)

आंदणामध्ये दिला आम्ही
देश सारा 'तेलगी'साठी!

सर्व नाती तोडली आम्ही
(हेलपाटे पोटगीसाठी)

वेदना ज्याची तया ठावे
ऊन तरसे सावलीसाठी

अंत येता जाणवू लागे
जन्म गेला पावलीसाठी

कळस ज्यांना व्हायचे होवो
दगड माझा पायरीसाठी

Average: 7.7 (18 votes)