पैलतीर...

प्रसाद शिरगांवकर

'सदैव माझ्या घरीच राहील'
कशास आशा धरू
उडून जाईल पैलतीरावर
कधीतरी पाखरू

असे हिवाळे, तसे उन्हाळे
तऱ्हा ऋतुंच्या किती
मावळणाऱ्या दिवसामाजी
जराजराशी क्षती
व्यर्थ धावत्या ऋतुचक्राची
कास कशाला धरू
उडून जाईल पैलतीरावर
कधीतरी पाखरू
<--break-->

विरून जाईल ताल जिवाचा
इथे कधी ना कधी
सरून जातील सूर सुखांचे
इथे कधी ना कधी
कशास माझे वाजत ठेवू
उगाच मी घुंगरू
उडून जाईल पैलतीरावर
कधीतरी पाखरू

Average: 8.5 (11 votes)