मला तू... तुला मी...

प्रसाद शिरगांवकर

किती आवडावे मला तू... तुला मी...
तरी का छळावे मला तू... तुला मी...

जसा चातका आठवे पावसाळा
तसे आठवावे मला तू... तुला मी...

सखे पारिजाता सवे देत राहू
हळू हेलकावे मला तू... तुला मी...

सदा दर्पणी पाहतो एकमेकां
अता ओळखावे मला तू... तुला मी...

जगू ग्रीष्मही हा वसंताप्रमाणे
ऋतू पांघरावे... मला तू... तुला मी...

जसा हात द्यावा धरेला नभाने
तसे सावरावे मला तू... तुला मी...

जिथे प्रेम आहे, तिथे ईश आहे
सदा आळवावे मला तू... तुला मी...

Average: 8 (296 votes)