मी जसा आहे, तसा आहे

प्रसाद शिरगांवकर

मी जसा आहे, तसा आहे

सिंह भासे मी कुणा केंव्हा
श्वानही बोले कुणी केंव्हा
बोलती कोणी ससा आहे
मी जसा आहे, तसा आहे

जे कुणा बोलायचे बोलो
जे कुणा वाटायचे वाटो
(मोकळा त्यांचा घसा आहे!)
मी जसा आहे, तसा आहे

रोखली माझी मुळे त्यांनी
तोडल्या फांद्या जरी त्यांनी
अंबरी माझा ठसा आहे!
मी जसा आहे, तसा आहे

कोष मी फोडेन दंभाचा
गर्भ मी जाणेन सत्याचा
घेतला हाती वसा आहे
मी जसा आहे, तसा आहे

Average: 8.7 (61 votes)