मी आठवणींना टाळत बसलो आहे

प्रसाद शिरगांवकर

मी आठवणींना टाळत बसलो आहे
अन स्वप्न उरीचे जाळत बसलो आहे

गातेस कसे हे सूर असे भरकटले
मी ताल तुझे सांभाळत बसलो आहे

अंधार सदा का माझ्या मागुन येतो
मी सूर्य कधीचे माळत बसलो आहे

दिसताच जिने मी धावत सुटलो होतो
(येऊन इथे ओशाळत बसलो आहे)

नाहीच पुरावा धडधडण्याचा कोठे
मी हृदय कधीचे चाळत बसलो आहे

येऊन कधी, काहूर तुझाही गेला
मी भास खुळे कवटाळत बसलो आहे

धुंदीत कितीसे क्षण आले अन गेले
मी सत्य अता पडताळत बसलो आहे

Average: 5.5 (22 votes)