मॅच आणि पुरुषांचं स्वप्न

प्रसाद शिरगांवकर

सगळ्या पुरुषांचं एक स्वप्न असतं
ऐन मॅचच्या दिवशी आपल्या
बायकोनं माहेरी गेलेलं असावं
आणि
सोफ्यावरती बसून राहून
बियरवरती बियर ढकलत
आपण मॅच बघत बसावं!

'हे काम राहिलंय, ते काम राहिलंय'
एखाद दिवशी भुणभुण नको
वाण्याकडुन सामान आणायची
मॅचच्या दिवशी वणवण नको
मॅचच्या दिवशी घरामधे
फक्त आपलं राज्य असावं!
आणि बियरवरती बियर ढकलत
आपण मॅच बघत बसावं!

आपल्या मॅच बघण्यावरून
उगाच भांडण व्हायला नको
आणि मॅच बघता आली नाही
म्हणून आपली तणतण व्हायला नको
भांडण, तणतण टाळण्यासाठी
आपण प्रार्थना करत रहावं
की ऐन मॅचच्या दिवशी आपल्या
बायकोनं माहेरी गेलेलं असावं!

'सोफ्यावरती पाय नको
हातात बियरचा ग्लास नको'
मॅचच्या दिवशी तरी असा
वळण लावायचा क्लास नको!
असला क्लास टाळण्यासाठी
जे जे जमेल ते ते करावं
आणि बियरवरती बियर ढकलत
आपण मॅच बघत बसावं!

मॅच असते हरली आपण
आणि संपल्या असतात बियरच्या बाटल्या
मनावरती तेंव्हा आपल्या
दुःखाच्या छाया असतात दाटल्या
अशा वेळी वाटतं आपल्याला
बायकोनं आपल्या जवळ असावं
आणि मॅच, बियर विसरून जाऊन
तिनं आपल्याल कुशीत घ्यावं!

अन जेंव्हा मॅच जिंकतो आपण
वेगळीच असते तेंव्हा नशा
तरंगत असतो तेंव्हा आपण
आणि धुंद असतात साऱ्या दिशा
तेंव्हा वाटतं आपल्या जल्लोषात
बायकोनं सुध्दा सामील असावं!

कारण प्रत्येक पुरुषाचं स्वप्न असतं
मॅच बघताना जरी आपल्या
बायकोनं माहेरी गेलेलं असावं...
पण हार-जीत काहीही होवो...
बायकोनं आपल्या सोबत असावं!!

Average: 8.5 (41 votes)