प्रसाद शिरगांवकर

जीवनाला ग्रासणारी वंचना माझी सखी
जाणतो आहे अता मी, वेदना माझी सखी

काय हे झाले फुलांचे वाळल्या का पाकळ्या?
वाळवंटी या सुखांची कल्पना माझी सखी

लोपलेल्या आठवांच्या मुक्त धारा सोबती
सर्वकाही संपल्याची भावना माझी सखी

राहिली पाठीवरी या थोडकी धूळाक्षरे
अर्थ सारा जाणल्याची वल्गना माझी सखी

वाकलो केंव्हातरी मी, मोडलो केंव्हातरी
वादळी जीवेषणेची साधना माझी सखी

भोवती उल्हासवेडा रंग नाही एकही
अंतरंगी रंगणारी अल्पना माझी सखी

Average: 7.1 (12 votes)