दगडांनी सतत दगडच रहायला हवं

प्रसाद शिरगांवकर

दगडांनी सतत दगडच रहायला हवं
आणि निपचित पडून रहायला हवं
रस्त्याच्या कडेला
मग अंगावरून निघून जावो
वारी, प्रेतयात्रा वा मोर्चा
दगडांनी मात्र सतत दगडच रहायला हवं

हरी-विठ्ठलाच्या नावानी कधी
भारून जावो आसमंत
वा तो शोकाकूल होवो
रामनाम सत्य च्या घोषणांनी
किंवा
मंतरून जावो कधी
इन्किलाब झिंदाबाद च्या गर्जनांनी
काहीही घडो रस्त्यावरती
काहीही जावो अंगावरून
पण दगडांनी तरीही दगडच रहायला हवं

अन घेतीलही कधी वारकरी दगडांना हाती
फासतील त्यांना शेंदूर
आणि पाहतील त्यातच ईश्वर
किंवा कदाचित प्रेतयात्रीही घेतील एखादा दगड
मडकं फोडायला
किंवा इन्कलाबी
तख्त फोडायला

घेतलाच तर घेऊ दे
फासलाच शेंदूर तर फासू दे
फोडलंच तख्त तर फोडू दे
दगडानं फारसं मनाला लावून घेऊ नये
त्यानी आपलं सतत दगडच बनून रहायला हवं
आणि निपचित पडून रहायला हवं
रस्त्याच्या कडेला

कारण
हरिनामाच्या गजराला
इन्किलाबच्या घोषणांना
आणि
रामनामसत्य च्या आवर्तनांनाही
अंगावर झेलण्यासाठी गरज असते
अशाच निपचित पडलेल्या दगडांची....

Average: 8.4 (26 votes)