आज ना उद्या...

प्रसाद शिरगांवकर

बीज लावले, रुजेल आज ना उद्या
वृक्ष गोजिरा झुलेल आज ना उद्या

एवढ्यात आवरू नकोस पाकळ्या
गंध अंगणी भरेल आज ना उद्या

जे तुला हवे तसेच गीत गात जा
गीत चांगले सुचेल आज ना उद्या

दाटली अमा जरी अता सभोवती
चांद अंबरी असेल आज ना उद्या

ना दिलीस माउलीस हाक तू जरी
माउलीच हंबरेल आज ना उद्या

शोध राजसा प्रकाश तू तुझा तुझा
ज्योत अंतरी जळेल आज ना उद्या

Average: 7.8 (12 votes)