अधीर ओठ टेकता

प्रसाद शिरगांवकर

अधीर ओठ टेकता जरी शहारतेस तू
मिठीत या सखे अशी कशास लाजतेस तू!

फुलून पारिजात हा उभा तुझ्याच अंगणी
उगाच लाजतेस अन सुवास टाळतेस तू

तुला न पाहता उनाड चंद्रही न मावळे
कशास 'चांदणे कुठे' असे विचारतेस तू?

अता कुठे जरा जराच रंगतेय ही निशा
अशात हाय कुंचलाच दूर सारतेस तू

सखे तुझ्या मिठीतलाच मागतोय स्वर्ग मी
कुशीवरी अशी फिरून पाठ दावतेस तू

Average: 7.6 (45 votes)