तूच गा रे...।
भेटण्याला वाकले आभाळ सारे
सांग तू आतातरी येशील का रे?
धावुनी मागे तुझ्या वेड्याप्रमाणे
श्रांत आता जाहले बेभान वारे
भेटण्याला वाकले आभाळ सारे
सांग तू आतातरी येशील का रे?
धावुनी मागे तुझ्या वेड्याप्रमाणे
श्रांत आता जाहले बेभान वारे
थांबले केंव्हाच सारे, एकटा मी चालतो
सोबतीला फक्त तारे, एकटा मी चालतो
धाव घेण्यालायकीची एकही नाही दिशा
भोवताली खिन्न वारे, एकटा मी चालतो
कसा कैफ़ होता, कसा माज होता
व्यभीचार त्यांचा घरंदाज होता!
जरी पाठ माझी, तरी घाव झाला
सखा भेटला तो, दगाबाज होता
झगमगणारे अंबर तू
दरवळणारे अत्तर तू
ओठांवरला प्रश्न कधी
हृदयामधले उत्तर तू
आले किती खलाशी, गेले किती खलाशी
वाहून सागराने नेले किती खलाशी
आपापला किनारा ज्याचा तयास प्यारा
कोणास खंत नाही मेले किती खलाशी
आजही तुझ्या घरात थांबली तस्र्ण रात
आजही तस्र्ण चंद्र पेटतो तुझ्या उरात
का अशी तुझी मिजास, दूर लोटले नभास
ही अशी कधी कुणास भेटते न चांदरात
त्यांच्या ऋतुंप्रमाणे जगणे मला न आले
ते सांगतील तेंव्हा फुलणे मला न आले
हा चेहराच माझा या आरशात आहे
भलत्याच चेहर्यांना बघणे मला न आले
भोवताली गाव सारे थांबले होते
दूर माझे खिन्न वारे थांबले होते
वादळे झेलून गेलो मी कुण्या देशी
माझियासाठी किनारे थांबले होते
पाहिजे ते सर्व केले वेळच्यावेळी
ना मला काही मिळाले वेळच्यावेळी
देत आहे मी तुला ही राखरांगोळी
मी जळोनी राख झाले वेळच्यावेळी
माझे जरा तरी तू ऐकून बोलणे घे
विझवून हे निखारे पदरात चांदणे घे
सारेच फेकुनी दे काटे उरातले तू
श्वासांत मोगर्याचे निष्पाप गंधणे घे
©2000-2018 Prasad Shirgaonkar, All rights reserved.