मी पेपर वाचत असतो
मी पेपर वाचत असतो
अन आकडे मोजत असतो
हे इथे कितीसे गेले
ते तिथे कितीसे गेले
कुणि कैलासाला गेले,
अल्लाला प्यारे झाले
दंग्यात कुणी जळलेले
हल्ल्यात कुणी फुटलेले
अन पूर, सुनामी कोठे
...मातीत किती पुरलेले
मी पेपर वाचत असतो
अन आकडे मोजत असतो
हे इथे कितीसे गेले
ते तिथे कितीसे गेले
कुणि कैलासाला गेले,
अल्लाला प्यारे झाले
दंग्यात कुणी जळलेले
हल्ल्यात कुणी फुटलेले
अन पूर, सुनामी कोठे
...मातीत किती पुरलेले
दगडांनी सतत दगडच रहायला हवं
आणि निपचित पडून रहायला हवं
रस्त्याच्या कडेला
मग अंगावरून निघून जावो
वारी, प्रेतयात्रा वा मोर्चा
दगडांनी मात्र सतत दगडच रहायला हवं
काही काही गोष्टी
मला अजूनही कळत नाहीत
एका पावसात
वाहून जातात गावंच्या गावं
अतीवृष्टीमुळे...
आणि पाठोपाठच्या उन्हाळ्यात
गावा गावांतून
नाहीशी होते वीज,
धरणात पाणी नसल्याच्या नावाखाली...
कोसळून वाहून जाणाऱ्या पाण्याचे
हिशोब काही जुळत नाहीत
काही काही गोष्टी
मला अजूनही कळत नाहीत
पंधरा ऑगस्ट हा एक उत्सवच असतो
वेगवेगळ्या वाहिन्यांमधून भळभळणाऱ्या
बाजारू देशभक्तिपटांचा
आणि
चौकाचौकात निमूटपणे उभ्या असलेल्या
तिरंग्यांना
कर्कश्श गाणी ऐकवणाऱ्या
उन्मत्त ध्वनिवर्धकांचा...
दुष्मनी त्यांची अशी हळुवार आहे
दादही त्यांची जणू तलवार आहे!
मस्तकी घेऊन मजला नाचती ते
हे कशाचे प्रेम, हा व्यवहार आहे
असायचा तेजाचा पर्वत माझा भारत
करायचा तार्यांशी शर्यत माझा भारत
कितीक नेते, किती लफंगे, भ्रष्टाचारी
लुटणार्यांची बनला दौलत माझा भारत
आले किती खलाशी, गेले किती खलाशी
वाहून सागराने नेले किती खलाशी
आपापला किनारा ज्याचा तयास प्यारा
कोणास खंत नाही मेले किती खलाशी
मानवाने जीवघेणे युद्ध का खेळायचे?
माणसाने माणसाला का असे मारायचे?
आसमंती वर्षती ही आजही अस्त्रे पुन्हा
एकमेकाने दुजाचे देश का जाळायचे?
तेजाने तळपत होता भास्कर तो गझलेचा
शून्यात लोपला आता भास्कर तो गझलेचा
हातात घेतली होती त्याने मशाल चैतन्याची
आजन्म पेटला होता भास्कर तो गझलेचा
येतात घोळक्याने, जातात घोळक्याने
आयुष्य का असे हे जगतात घोळक्याने
कोणीच येत नाही जीवास वाचवाया
प्रेतास जाळण्याला जमतात घोळक्याने
©2000-2014 Prasad Shirgaonkar, All rights reserved.